हिंजवडीपासून जवळ असल्याने मागच्या दहा वर्षात (Pune) पुनावळे परिसरात इमारती, सोसायट्या आणि लोकवस्ती वाढली. कधी कचरा डेपो, कधी अंतर्गत रस्ते तर कधी प्रदूषण अशा वेगवेगळ्या कारणांनी पुनावळेतील नागरिकांमध्ये रोष दिसून येत होता. वाढत असलेले धुळीचे साम्राज्य, एकूणच शहरातील हरित क्षेत्रात होत असलेली घट आणि स्वच्छ हवा मिळण्याची कमतरता यामुळे स्थानिक पातळीवर माजी नगरसेवक राहुल कलाटे यांच्या पुढाकारातून नागरिकांनी दीर्घकाळ संघर्ष करत कचरा डेपो प्रकल्प रद्द करून घेत, त्याचठिकाणी ऑक्सिजन पार्कची कल्पना पुढे आणली.
स्थानिकांनी केलेल्या सततच्या प्रतिकारामुळे आणि मागण्या केल्यामुळे हा प्रकल्प आता प्रत्यक्षात आला आहे. पुनावळेसह पिंपरी चिंचवड परिसरात शहरीकरणामुळे हरित क्षेत्र हळूहळू कमी होत असल्याचे आणि त्यामुळे हवेतील प्रदूषण वाढत असल्याचे चित्र आहे, परंतु ऑक्सिजन पार्कसारखे प्रकल्प खऱ्या अर्थाने यावर संजीवनी ठरणार आहेत.
पुनावळे येथे सुमारे २ एकर जागेत ऑक्सिजन पार्कची निर्मिती पूर्ण झाली असून लवकरच त्याचे लोकार्पण होईल. ‘काशिनाथ कृष्णाजी ढवळे (पाटील)’ यांच्या नावाने पुनावळेत ऑक्सिजन पार्क कार्यान्वित कऱण्यात आलेला आहे. स्थानिक पातळीवर नागरिकांमध्ये याबद्दल अधिकाधिक जागरूकता वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातील असेही यावेळी कलाटे म्हणाले.
Video : पुणेकरांना मेट्रो, बस प्रवास मोफत मिळणार; NCP च्या जाहीरनाम्यात दादांची गेमचेंजर आश्वासनं
कचरा डेपोसाठी हजारो वृक्षांची कत्तल करून पर्यावरणाची होणारी हानी रोखण्यासाठी राहुल कलाटे यांनी पहिल्या दिवसांपासूनच या कचरा डेपोला कडाडून विरोध केला. महापालिकेतील जनरल बॉडीत व ठरावावेळी देखील प्रखर विरोध केला. नागरिकांनी केलेल्या आंदोलनाला समर्थन देत, त्यात सक्रीय सहभाग घेतला. अगदी कचरा डेपोच्या जागेची मोजणी करण्यास आलेल्या शासकीय अधिकाऱ्यांना केलेल्या कडव्या विरोधामुळे त्यांना रिकाम्या हाताने माघारी परतावे लागले होते. या सर्व बाबींमुळे कचरा डेपोच्या प्रकल्पासाठीच्या तांत्रिक बाबींची अधिकाऱ्यांना पूर्तता करता आली नाही.
कचरा डेपो प्रकल्प रद्द
सलग १५ वर्षांहून अधिक काळ चाललेल्या आंदोलनानंतर, पुनावळेमध्ये प्रस्तावित कचरा डेपो प्रकल्प रद्द करण्यात आला. स्थानिक भटकंती, पर्यावरणीय तणाव आणि आरोग्यावर होणाऱ्या परिणामांमुळे नागरिकांनी यासाठी जोरदार विरोध केला, आणि शेवटी हा निर्णय घेतला गेला. यासाठी प्रभाग क्रमांक २५ चे लोकप्रतिनिधी म्हणून राहुल कलाटे यांनी महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला.
पुनावळे परिसरातील वाढते शहरीकरण आणि नागरीकरणाच्या धर्तीवर हा कचरा डेपो किती घातक आणि हानिकारक आहे याबाबत चर्चा करण्यासाठी कलाटे यांनी तत्कालीन उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेतली होती. तसेच तत्कालीन आमदार अश्विनी जगताप यांनीही याबद्दल विधीमंडळात मागणी केली होती. पुढे या प्रस्तावित कचरा डेपोला स्थगिती देण्यात आली, आता याच ठिकाणी ऑक्सिजन पार्क नावारूपास येत आहे.
पुनावळे येथील ऑक्सिजन पार्क हा एक मोठ्या प्रमाणावर पर्यावरणपूरक हरित बेल्ट विकसित करण्याचा प्रकल्प आहे. बगीचा, झाडे, चालण्याचे मार्ग, ज्येष्ठ नागरिकांसाठी विश्रांतीचा परिसर या सर्वांचा समावेश असेल. नागरिकांनी याठिकाणी जागा संरक्षित ठेवण्याची तसेच कचरा डेपोच्या जागी हरित जागा वाढवण्याची मागणी केली होती. हा प्रश्न स्थानिकांनी राहुल कलाटे यांच्याकडे मांडला, ज्याला न्याय देण्यासाठी कलाटे यांनी एक जागृत लोकप्रतिनिधी म्हणून पुढाकार घेऊन काम केले.
ओपन जिम आणि सार्वजनिक सुविधा
पुनावळेत यापूर्वी नागरिकांसाठी ओपन जिमसारख्या सुविधा करण्यात आल्या असून फिटनेस सर्किट, ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना चालण्यासाठी सुलभ पायवाटा, शांत विश्रांतीची जागा अशा सुविधा प्रस्तावित आहेत. या सर्व गोष्टी नागरिकांचे आरोग्य आणि शारीरिक तंदुरुस्तीचा हेतू लक्षात ठेवून आखण्यात आल्या आहेत, असेही माजी नगरसेवक राहुल कलाटे म्हणाले.
– योग्य लोकप्रतिनिधीची निवड – शाश्वत विकासाचा मार्ग
– कचरा डेपो प्रकल्प रद्द — नागरिकांचा विजय
– हरित ऑक्सिजन पार्क प्रस्तावित — प्रदूषणावर उपाय
– ओपन जिम व आरोग्य सुविधांसह जागा
– पर्यावरण आणि आरोग्य दोन्हीसाठी सकारात्मक पाऊल
पुनावळेसह परिसरातील हरित क्षेत्रांची होत असलेली घट आणि नागरिकांच्या आरोग्यावर होणारे परिणाम लक्षात घेता, ऑक्सिजन पार्कसारख्या ग्रीन बेल्टची नितांत गरज होती. स्थानिक नागरिकांनी कचरा डेपोला विरोध करून पर्यावरणाच्या रक्षणासाठी जे यश मिळवले, ते प्रेरणादायी आहे. काशिनाथ कृष्णाजी ढवळे (पाटील) ऑक्सिजन पार्कमुळे पुनावळेला स्वच्छ हवा, हिरवळ आणि आरोग्यदायी वातावरण मिळणार आहे. तसेच नागरिकांसाठी ओपन जिमसह सार्वजनिक सुविधा उपलब्ध करून देऊन, निरोगी जीवनशैलीला चालना देण्याचा आमचा प्रयत्न आहे. विकासाबरोबरच पर्यावरण आणि संस्कृतीचे रक्षण करणे, हेच आमचे खरे विकासात्मक धोरण आहे असं कलाटे म्हणाले.
ऑक्सिजन पार्कमुळे पुनावळेतील नागरिकांना निश्चितच लाभ होणार आहे. मागील अनेक वर्षांपासून या भागात काम करणारे राहुलदादा कलाटे यांचा अनुभव आणि ऑक्सिजन पार्कसाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचा प्रभागाला निश्चितच लाभ होत आहे. प्रभागाचा विकास साधत असताना, पर्यावरण संरक्षण आणि नागरिकांच्या मागण्यांना प्राधान्य देणे किती महत्त्वाचे ठरते, हे या पार्कच्या उभारणीतून लक्षात येते असं रेश्मा चेतन भुजबळ म्हणाल्या.
वाढत्या शहरीकरणामुळे शहरातील हरित क्षेत्रांचा विचार करणे आजकाल खूप महत्त्वाचे आहे. धूळ आणि हवा प्रदूषण रोखणे आणि नागरिकांचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य राखणे यासाठी अधिक हरित जागा आवश्यक असते. ऑक्सिजन पार्कच्या माध्यमातून हे होऊ शकते. राहुल कलाटे यांनी या पार्कसाठी घेतलेला पुढाकार महत्त्वाचा ठरला असून, पुनावळेकरांना याचा नक्कीच लाभ होणार आहे असं कुणाल वाव्हळकर म्हणाले.
पुनावळेमध्ये प्रस्तावित कचरा डेपो प्रकल्प रद्द करून उभारण्यात आलेला हा ऑक्सिजन पार्क खऱ्या अर्थाने विकास आणि जनतेचा विश्वास यातून तयार झालेला ऑक्सिजन पार्क आहे. राहुल दादा कलाटे यांनी नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन या पार्कसाठी जे परिश्रम घेतले, सातत्याने पाठपुरावा केला, त्यामुळेच पुनावळ्यातील नागरिकांना आज स्वच्छ हवा आणि विरंगुळा केंद्र उपलब्ध झाले आहे असं श्रुती राम वाकडकर म्हणाले.
