अशोक खरातप्रकरणावरुन सध्या (Kharat) आरोप प्रत्यारोप आणि राजकीय वातावरण तापलं आहे. दुसरीकडे एसआयटीकडून आरोपी खरातची कसून चौकशी सुरू असून ईडीनेही त्याच्या घरी, कार्यालयात छापेमारी केली. विशेष म्हणजे, कालच रुपाली चाकणकर यांच्या बहिण प्रतिभा चाकणकर यांची देखील एसआयटीने तब्बल 10 तास चौकशी केली. मात्र, आपल्या नावे बनावट खाते उघडण्यात आले असून बँकेच्या व्यवहाराशी आपला कुठलाही संबंध नसल्याचं त्यांनी म्हटलं.
आता तब्बल 28 दिवसानंतर रुपाली चाकणकर यांनी खरातप्रकरणी होत असलेल्या आरोपांवर सोशल मीडियातून आपली बाजू मांडली आहे. रुपाली चाकणकर यांनी फेसबुक पोस्ट करत, बीडमधून आलेल्या पत्राची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. कुठल्याही पुराव्याच्या आधारे कुणीतरी लिहलेल्या पत्रावरुन आपणास आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केल्याची भावना त्यांनी सोशल मीडियातून व्यक्त केली. तसेच, एसआयटी तपास निष्पक्षपणे व्हावा म्हणूनच आपण मीडियापुढे आलो नाही, असेही त्यांनी म्हटले.
2 कोटी 40 लाखांची उलाढाल! प्रतिभा चाकणकर आणि वकिलाने काय दिली माहिती?
महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात आजतागायत अनेकांवर आरोप झाले, त्या आरोपांचे पुरावे माध्यमांनी सबंध महाराष्ट्राला दाखवले व आरोप करणाऱ्यांनीही पुराव्यानिशी आरोप केले. मात्र, आज 28 दिवस होत आहेत, माझ्यावर व माझ्या परिवारावर बेछूट व कपोलकल्पित आरोप हे फक्त हेतूपुरस्सर व बदनाम करण्यासाठी होत आहेत, हे वेळोवेळी समोर येत आहे. याबाबतीत आरोप करणाऱ्यांनी ना पुरावे दिले ना प्रसार माध्यमांनी ते मागितले. तसेच, निनावी पत्राबाबत जे कोणी आरोप करणारे आहेत त्यांनी सांगावे की ते पत्र त्यांच्यापर्यंत कसे आले? असा सवाल रुपाली चाकणकर यांनी उपस्थित केला आहे.
एकप्रकारे त्यांनी कुणाचंही नाव न घेता बीडमधील महिला नेत्याच्या पत्रावरच भाष्य केल्याचं दिसून येतंय. कोणतीही शहानिशा न करता केवळ आणि केवळ बदनामीचा कुटील डाव साध्य करण्यासाठी, पोलीस प्रशासनाला प्राप्त झालेलं एक निनावी पत्र माध्यमांकडे सुपूर्त करून दिवसभर चर्चासत्र घडवून आणले गेले,हे घडवून आणण्यामागे कुणाचे “सौजन्य “होते हे समोर आले पाहिजे. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनीही ज्या पत्रावर नाव व पत्ता नाही अशा निनावी पत्राला कायदेशीरदृष्ट्या काहीही अर्थ नसल्याने महत्त्व देता येत नाही, हे माध्यमांसमोर येत स्पष्ट केले आहे.
हे सगळ स्पष्ट केलं असतानाही, खोडसाळपणा करण्यासाठी हे पत्र कोणी लिहिले, कोठून आले याची चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी रुपाली चाकणकर यांनी केली आहे. यानिमित्ताने एक नवा चुकीचा पायंडा पाडला जात आहे. केवळ तर्कवितर्क, अंदाज, सुरस कथा आणि रंजक अफवा यांच्या आधारावर मला व माझ्या परिवाराला मानसिक त्रास दिला जातोय, बदनाम केले जात आहे ,हे अत्यंत खेदजनक आहे. मी पहिल्या दिवसापासून माझी ठाम आणि स्पष्टपणाने भूमिका मांडत आले आहे.
खरात प्रकरणात कोणत्याही आर्थिक व्यवहारात, जमीन व्यवहारात व इतर कोणत्याही दुष्कृत्यात दुरान्वये आमचा संबंध नाही. शेवटी सत्य प्रखरतेने समोर येईलच, हा माझा दृढ विश्वास आहे. तरीही गेले काही दिवस प्रसारमाध्यमांमधून माझ्याविरोधी एकतर्फी येणाऱ्या बातम्या यावर मी प्रतिक्रिया किंवा कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही. कारण, SIT व चौकशी करत असलेल्या तपास यंत्रणेला निष्पक्षपणे चौकशी करता यावी हाच हेतू आहे, असेही चाकणकर यांनी म्हटलं आहे.
