Sai Balaji Education Society : साईबालाजी एज्युकेशन सोसायटीच्या वतीने क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी कॉर्पोरेट फुटबॉल लीग आणि स्टुडंट फुटबॉल लीग या दोन महत्त्वपूर्ण फुटबॉल स्पर्धांचे आयोजन 23 जानेवारी ते 26 जानेवारी 2026 दरम्यान करण्यात आले होते. विद्यार्थ्यांसह कॉर्पोरेट क्षेत्रातील सहभागी खेळाडूंमध्ये क्रीडावृत्ती, संघभावना, शिस्त आणि नेतृत्वगुणांचा विकास घडवून आणणे हा या स्पर्धांचा मुख्य उद्देश होता. तसेच या स्पर्धा मागील 10 वर्षापासून यशस्वीरित्या आयोजित केल्या जात आहेत.
कॉर्पोरेट फुटबॉल लीगमध्ये विविध 16 नामांकित कॉर्पोरेट संस्थांतील कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या स्पर्धेमुळे व्यावसायिक जीवनातील ताणतणावातून मुक्तता मिळण्यासोबतच आरोग्यदायी व सक्रिय जीवनशैलीचा संदेश देण्यात आला. त्याचप्रमाणे, स्टुडंट फुटबॉल लीगमध्ये 500 हुन अधिक विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी आपली क्रीडा कौशल्ये, चिकाटी आणि संघभावना प्रभावीपणे सादर केली. स्पर्धेच्या संपूर्ण कालावधीत खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे दर्शन घडवत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. चुरशीचे सामने, शिस्तबद्ध खेळ आणि खेळाडूवृत्ती यामुळे संपूर्ण स्पर्धेला विशेष रंगत प्राप्त झाली.
साईबालाजी एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मनीष आर. मुंदडा म्हणाले की, “ या स्पर्धा ह्या केवळ विजय किंवा पराजयापुरता मर्यादित नसून या माध्यमातून शिस्त, संघभावना, नेतृत्वगुण आणि जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमता विकसित होते. यासारखे उपक्रम युवकांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन, आत्मविश्वास आणि सर्वांगीण विकास घडवून आणतात.” बक्षीस वितरण समारंभास प्रा.निरुपमा मुंदडा सचिव साईबालाजी एज्युकेशन सोसायटी या देखील उपस्थित होत्या.
साईबालाजी कॉर्पोरेट फुटबॉल लीग (सीएफएल) सीझन 10 ‘फुटझेलो 2026’ या स्पर्धेत आयडियाज संघाने विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत अॅक्सेन्चर संघाने उपविजेतेपद मिळवले, तर विप्रो संघाने तृतीय क्रमांक (द्वितीय उपविजेतेपद) प्राप्त केले.
साईबालाजी फुटबॉल लीग (अंडर–21) चॅम्पियनशिप सीझन 4 या स्पर्धेत गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स संघाने विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत इंदिरा विद्यापीठ संघाने उपविजेतेपद मिळवले.
मोबाईल, स्टील अन् औषधे स्वस्त होणार, ‘मदर ऑफ ऑल डील्स’ नंतर भारतीय बाजारपेठेत काय बदल होणार?
या उपक्रमांमुळे क्रीडा संस्कृती अधिक बळकट होत असून युवकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता, सकारात्मक ऊर्जा आणि सामाजिक बांधिलकी निर्माण होत असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. साईबालाजी एज्युकेशन सोसायटीच्या या अभिनव उपक्रमाचे सर्व स्तरांतून विशेष कौतुक करण्यात येत आहे.
