आकुर्डीत स्टार्टअपचा मंत्र! डी. वाय. पाटील फार्मसी कॉलेजमध्ये उद्योजकतेवर विशेष मार्गदर्शन

SPPU Startup Talk Series 2.0 : आकुर्डीतील डी. वाय. पाटील फार्मसी कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना, स्टार्टअपसाठी मार्गदर्शन करण्यात आले.

News Photo   2026 11 25T174347.939

News Photo 2026 11 25T174347.939

SPPU Startup Talk Series 2.0 : पिंपरी-चिंचवडमधील आकुर्डी येथील (Pune) डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये विद्यार्थ्यांच्या कल्पनांना उद्योजकतेची दिशा देणारी ‘एसपीपीयू स्टार्टअप टॉक सिरीज – २.०’ ही विशेष व्याख्यानमाला उत्साहात पार पडली. महाविद्यालयाच्या इन्स्टिट्यूशन्स इनोव्हेशन कौन्सिल (IIC) आणि एंटरप्रेन्योरशिप सेल (E-Cell) यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेंटर फॉर इनोव्हेशन, इनक्युबेशन अँड एंटरप्रायझेस यांचे या कार्यक्रमाला प्रायोजकत्व लाभले.

नवीन व्यावसायिक संकल्पना विकसित करण्यापासून स्वतःचा स्टार्टअप उभारण्यापर्यंतच्या प्रवासाची माहिती विद्यार्थ्यांना मिळावी, हा या व्याख्यानमालेमागील प्रमुख हेतू होता. यासाठी प्रतिभा इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंटचे स्टार्टअप व इनक्युबेशन विभागप्रमुख प्रा. गुरुराज डांगरे आणि इंटेलोबाईटचे सह-संस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल मुंजारे यांना वक्ते म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. दोन्ही वक्त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत उद्योजकतेतील संधी आणि आव्हानांवर प्रकाश टाकला.

पुणे कोर्टाबाहेरील थरारातील जखमी हा चव्हाण हत्येतील आरोपी तर, हल्लेखोरांचीही ओळख पटली

१२० हून अधिक स्टार्टअप्सना मार्गदर्शन केल्याचा अनुभव असलेल्या प्रा. गुरुराज डांगरे यांनी नवउद्योजकांनी व्यवसायाची सुरुवात करताना कोणत्या बाबींचा विचार करावा, संकल्पनेचे व्यवसायात रूपांतर कसे करावे आणि स्टार्टअपच्या उभारणीसाठी कोणती रणनीती आखावी, याविषयी मार्गदर्शन केले. तर कुणाल मुंजारे यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), ऑटोमेशन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून व्यवसायाचा विस्तार कसा साधता येतो, याची माहिती दिली. बदलत्या तंत्रज्ञानाच्या काळात नवकल्पनांचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. निरज व्यवहारे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सह-निमंत्रक डॉ. पल्लवी चौधरी आणि डॉ. अनिकेत गरुड यांनी उपक्रमाची जबाबदारी सांभाळली, तर समन्वयक डॉ. भाग्यश्री वरुडे आणि प्रा. कल्याणी चांदे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली. विद्यार्थ्यांना उद्योजकतेच्या क्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभव आणि नव्या संधींची ओळख करून देणारा हा उपक्रम ठरला.

Exit mobile version