राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार बी. फार्मसी अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीवर कार्यशाळा संपन्न
आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात आधुनिक अध्यापन पद्धतींवर मार्गदर्शन करणारी कार्यशाळा झाली.
NEP 2020 B Pharmacy Curriculum : आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील (Pune) औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार बी. फार्मसी अभ्यासक्रमाची अंमलबजावणी कशी करावी, यावर एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या गुणवत्ता सुधारणा कार्यक्रमांतर्गत प्रायोजित या कार्यशाळेत फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाच्या सुधारित अभ्यासक्रमाची रचना, अध्यापन पद्धती आणि मूल्यमापन प्रक्रिया यावर चर्चा झाली. विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक डॉ. विनायक जोशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी प्राध्यापकांनी नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती स्वीकारण्याची गरज व्यक्त केली.
कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर अध्यापनासाठी सहाय्यक साधन म्हणून करावा; मात्र विद्यार्थ्यांची आकलन क्षमता, चिकित्सक विचार आणि बौद्धिक विकास यावर त्याचा विपरीत परिणाम होणार नाही, याची काळजी घ्यावी, असं डॉ. विनायक जोशी यांनी सांगितलं. डी. वाय. पाटील विद्यापीठ, नवी मुंबई येथील स्कूल ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. राकेश सोमानी यांनी नवीन बी. फार्मसी अभ्यासक्रमाची उद्दिष्टं, रचना आणि अंमलबजावणी याबाबत मार्गदर्शन केलं. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे येथील सहयोगी प्राध्यापक डॉ. सतीश पोळशेट्टीवार यांनी आधुनिक तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने फार्मसी शिक्षण अधिक प्रभावी आणि विद्यार्थी-केंद्रित करण्याच्या पद्धती स्पष्ट केल्या.
पुणेकरांच्या आरोग्याचा खेळ थांबवा! खडकवासला धरणात सांडपाणी आढळताच अमोल बालवाडकर संतप्त
महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयक डॉ. शिल्पा चौधरी यांनी सुधारित अभ्यासक्रमानुसार अध्यापन आणि अध्ययन पद्धती विकसित करण्याबाबत माहिती दिली. सहयोगी प्राध्यापक डॉ. रेवन करोडी यांनी परीक्षा पद्धती आणि अध्ययन निष्पत्तीशी संबंधित मूल्यमापन प्रक्रियेवर मार्गदर्शन केलं. या कार्यशाळेला विविध महाविद्यालयांतील ७५ हून अधिक प्राध्यापक उपस्थित होते. नवीन अभ्यासक्रम समजून घेण्यासाठी आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरेल, असं महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नीरज व्यवहारे यांनी सांगितलं. यावेळी संशोधन आणि उत्कृष्ट शैक्षणिक कार्यासाठी फार्माकोग्नोसी विभागाचे विभागप्रमुख डॉ. रेवन करोडी यांना महाविद्यालयातर्फे ‘उत्कृष्ट प्राध्यापक’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.
कार्यशाळेच्या आयोजनासाठी डॉ. शिल्पा चौधरी यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी योगदान दिलं. विद्यार्थी प्रतिनिधी दीक्षा पांडे आणि माही पहाडे यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं, तर प्रा. डॉ. वैभव वैद्य यांनी आभार मानले. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेचे विश्वस्त तेजस पाटील आणि संकुल संचालक रिअर ॲडमिरल अमित विक्रम (निवृत्त) यांनी आयोजकांचं अभिनंदन केलं. या उपक्रमातून नवीन शैक्षणिक धोरणानुसार फार्मसी शिक्षण अधिक परिणामकारक करण्यासाठी प्राध्यापकांना मार्गदर्शन मिळालं.