महाराष्ट्रातील 47 लोकसभा मतदारसंघांची चर्चा एकीकडे आणि बारामती लोकसभा (Baramati Lok Sabha) मतदारसंघाची चर्चा दुसरीकडे! या एकाच वाक्यावरुन तुम्हाला बारामतीमध्ये लोकसभा निवडणुकांचा ज्वर किती तापला असावा याचा अंदाज येईल. भाजप (BJP) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रत्यक्षात ही लढाई सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या पराभवासाठी सुरु केली असली तरी यामागे शरद पवार यांचा पराभव करणे हेच लक्ष्य आहे हे तर उघड आहे. या लढाईसाठी अजितदादाही कंबर कसून कामाला लागले आहेत. दर दोन ते तीन दिवसांनी बारामतीमध्ये वेगवेगळे कार्यक्रम, सभा, विविध विकास कामांचे उद्घाटन सुरु आहे. या दरम्यान ते काही वेळा भावनिकही होत आहेत.
पण अजितदादांच्या बाजूने या लढाईचा चेहरा नेमका कोण असणार हा प्रश्न अद्याप उरतोच. याच प्रश्नाचे उत्तर यातून शोधण्याचा प्रयत्न करु.
काही दिवसांपूर्वी अजितदादांनी सातारा, शिरुर, रायगड आणि बारामती या जागा आपण लढणारच असे त्यांनी सांगितले. तिथूनच चर्चा सुरु झाली की अजितदादांकडून उमेदवार कोण असणार? विविध सभांमधून अजितदादा माझ्या शब्दावर तुम्ही माझ्या विचाराचा उमेदवार निवडून द्या. लोकसभेला दगाफटका झाला तर मी विधानसभेला वेगळे परिणाम बघायला मिळतील असा दमही ते देताना दिसतात. मात्र नुकतेच एका सभेत बोलताना त्यांनी आपला उमेदवार नवखा आहे. तो पहिल्यांदाच खासदार होणार आहे, असे सांगतिल्याने नेमका कोण उमेदवार असणार असा सवाल विचारला जाऊ लागला आहे.
अशात मागील काही दिवसांपासून बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार सक्रिय झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध कार्यक्रमांना त्यांची उपस्थिती दिसत आहे. पक्षाच्या बॅनर्सवर अजितदादांसोबतच त्यांचेही फोटो दिसून येत आहेत. नुकतेच बारामती दाखल झालेल्या प्रचार रथावरही सुनेत्रा पवार यांचा फोटो दिसत आहे. अजितदादा म्हणाले त्याप्रमाणे त्या निवडणुकीला उभ्या राहिल्या आणि निवडून आल्या तर त्या पहिल्यांदाच खासदार होतील. यापूर्वी त्यांनी कधीही कोणतीही निवडणूक लढविलेली नाही. पक्षातही त्या सक्रिय नव्हत्या.
पार्थ पवार यांचाही विचार केला तर त्यांचे नाव काही कारणांमुळे मागे पडते. याचे कारण म्हणजे बारामतीमधील त्यांची तयारी. अजित पवार यांनी स्वतः प्रचारात भाग घेतला तरी पार्थ पवार यांची स्वतःची बारामतीमध्ये तयारी नाही हे स्पष्ट आहे. 2019 मध्ये मावळ लोकसभा मतदारसंघात पराभव झाल्यानंतर ते पक्षात आणि राजकारणात फारसे सक्रिय दिसले नाहीत. याशिवाय भाजप आणि अजित पवार यांचे कितीही पाठबळ मिळाले तरीही पार्थ पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत झाल्यास सुप्रिया सुळे यांचे पारडे जड होऊ शकते.
अजित पवार मागील काही दिवसांपासून मतदारांना वारंवार भावनिक आवाहानला बळी पडू नका असे आवाहन करत आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत डाग लागला, तर राजकारणातील माझी किंमत कमी होईल, आगामी निवडणुकीत सर्वजण माझ्याविरोधात एकत्र येतील, अशी भीती व्यक्त करत आहेत. एवढेच नव्हे तर पवार कुटुंबामध्ये काय शिजते आहे याचाही अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. पवार कुटुंबाची भावकी मोठी आहे. ही भावकी शरद पवार यांना साथ देईल असे बोलले जाते. त्याची उद्विग्नता अजित पवार यांनी व्यक्त केली.
सारे कुटुंब एका बाजूला असेल आणि माझ्या कुटुंबाला एकटे पाडण्याचा प्रयत्न केला जाईल अशीही व्यथा त्यांनी बोलून दाखविले. पुढे त्यांनी शरद पवार यांचे नाव न घेता बारामतीमधील वरिष्ठ भावनिक करतील. भावनिक होऊन प्रश्न सुटत नाहीत. लोकांचे प्रश्न सोडविण्याची धमक माझ्यात आहे, असा दावा ते जाहीर सभांमधून करत आहेत. पवार कुटुंबात फूट पडणार आणि अजित पवार एकटे पडणार याचा अर्थ बारामतीमधील लढत पवार कुटुंबामध्येच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्यातील अनेक राजकीय कुटुंबामध्ये वाद झाले मात्र पवार कुटुंब राजकीय भांडणापासून दूर राहील असे पवार समर्थकांना वाटत होते. ज्या पद्धतीने मुंडे भाऊ-बहिण, ठाकरे बंधू एकमेकांच्या विरोधात लढले, तशाच पद्धतीचे संघर्ष नणंद आणि भावजयी यांच्यात पाहायला मिळणार आहे. आणि या भावजयी दुसऱ्या, तिसऱ्या कोण नसून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार याच असणार आहेत, यावर जवळपास शिक्कामोर्तब झाला आहे. सध्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आपल्या पतीचा आहे आणि आपल्या पतीच्या पाठिशी उभे राहायचे आहे, यासाठी सुनेत्रा पवारही पुरेशा तयारीने रिंगणात उतरल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बारामतीमधील ही लढाई राज्यातच नव्हे तर देशात लक्षवेधी ठरणार आहे.