Download App

शरद पवार भाजपसोबत येणार का? गुप्त बैठकीतील चर्चेनंतर अमित शाहंचा थेट अजितदादांना फोन

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यातील गुप्त भेटीच्या चर्चा अद्याप कायम आहेत. अशात आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अजितदादांना फोन करुन पवारांसोबतच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याबाबतचा तपशील जाणून घेतला असल्याची माहिती आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही नेत्यांनी फोनवरुन या गुप्त बैठकीबाबत चर्चा केली. (Union Home Minister Amit Shah called Ajit Pawar to find out the details of what was discussed in his meeting with Sharad Pawar)

शरद पवार आणि अजित पवार यांनी शनिवारी (12 ऑगस्ट) शरद पवार यांची अतिशय गुप्त पद्धतीने भेट घेतली. पुण्यातील उद्योजक अतुल चोरडिया यांच्या कोरेगाव पार्क परिसरातील अलिशान निवासस्थानी ही बैठक झाली. बंडानंतरच्या दीड महिन्यात ही त्यांची चौथी भेट ठरली. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही उपस्थित होते. या भेटीची राज्याच्या राजकारणात बरीच चर्चा झाली.

काका-पुतण्याची जवळीक; ‘मविआ’त नव्या घडामोडी : आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी काँग्रेस अनुकूल

भेटची पूर्वकल्पना दिल्लीलाही होती?

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार आणि शरद पवार यांची भेट पूर्वनियोजित होती, आधी एका हॉटेलमध्ये ही भेट होणार होती. मात्र चोरडिया यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. या भेटीबाबत दिल्लीलाही पूर्वकल्पना होती. या भेटीवर दिल्ली आणि राज्यातील भाजपचे नेते लक्ष ठेवून होते. याच बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याबाबतचा तपशील अमित शाह यांनी अजित पवार यांच्याकडून जाणून घेतला असल्याची माहिती आहे. त्यामुळे काका -पुतण्यात शिजतंय काय? असा सवाल विचारला जात आहे.

जेवायला निमंत्रण होते : अजित पवार

चोरडिया आणि आमचे दोन पिढ्यांचे संबंध आहेत. चोरडियांचे वडील हे पवार साहेबांचे वर्गमित्र होते. पवार साहेब तिकडून व्हिएसआयचा कार्यक्रम आटोपून येणार होते. माझा कार्यक्रम पुण्यातील चांदणी चौकात होता. त्यावेळेस चोरडियांनी पवार साहेबांना जेवायला बोलावलं होतं. जयंत पाटील त्यांच्याबरोबर होते. कारण, ते सुद्धा व्हिएसआय कमिटीचे सदस्य आहेत. जर एखाद्या दोन दोन पिढ्या ओळखीच्या असणाऱ्या व्यक्तीने जेवायला बोलावले तर त्यातून वेगळा अर्थ काढण्याचं काहीच कारण नाही, असा खुलासा अजित पवार यांनी आज कोल्हापूरमध्ये बोलताना केला.

मोठी बातमी : शरद पवारांना बाजूला ठेऊन ‘मविआ’? काँग्रेस अन् ठाकरे गटाची ‘प्लॅन बी’वर खलबत

शरद पवारांचे मन वळविण्याचे प्रयत्न?

राष्ट्रवादीमध्ये शरद पवार यांच्यासोबत उरलेल्या आमदार आणि खासदारांनीही आपल्यासोबत आणि पर्यायाने भाजपसोबत यावं, शरद पवारांनी सार्वजनिक व्यासपीठावरुन आशीर्वाद द्यावेत, अशी विनंती अजित पवार यांनी शरद पवार यांना केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दोन्ही गट एकत्रितपणे भाजपसोबत आल्यास केंद्रात मंत्रिपद निश्चित असल्याचेही अजित पवार यांनी शरद पवारांना आश्वासन दिले असल्याचे सांगितले जाते.

जयंत पाटलांच्या भावाला ईडीची नोटीस :

दरम्यान, शरद पवार-अजित पवार यांच्या भेटीमागे भगत पाटील यांचे कनेक्शन असल्याचे बोलले जात आहे. जयंत पाटील यांचे बंधू भगत पाटील यांना ईडीची नोटीस आली आहे. गत शुक्रवारीच त्यांना नोटीस आल्याची माहिती आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अजित पवार-शरद पवार यांची भेट झाली. यावेळी स्वतः जयंत पाटीलही उपस्थित होते. त्यामुळे याच नोटिसीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार-शरद पवार यांची भेट झाली असावी,  असं सांगितलं जात आहे.

follow us