पुण्याचा कारभार तब्बल तीन दशके हाकणारे तिन्ही कारभारी गेल्या (Pune) दोन वर्षांत काळाच्या पडद्याआड गेल्याने आता पुणे पोरके झाले अशी भावना व्यक्त केली जात आहे. महापालिकेच्या सन १९९२च्या निवडणुकीपर्यंत पुण्यामध्ये विठ्ठलराव गाडगीळ, जयंतराव टिळक या नेत्यांचे वेगवेगळे गट होते. पक्ष काँग्रेसच असला, तरीही पुण्याचा व महापालिकेचा कारभार एकहाती नव्हता. या निवडणुकीत सुरेश कलमाडी यांचे सर्वाधिक समर्थक पुणे महापालिकेत निवडून आले. त्यापाठोपाठ गाडगीळ व टिळक गटांतील अनेक ज्येष्ठ नगरसेवकांनीही कलमाडी यांचे नेतृत्व मान्य केले. नुकतेच कलमाडी गेले.
दरम्यानच्या काळात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमुळे कलमाडींच्या कारभारीपणावर शिक्कामोर्तब झाले. कलमाडींचे कारभारीपण जवळपास दहा वर्षे निर्विवाद, तर नंतरची पाच वर्षे अजित पवारांसोबतच्या भागीदारीमध्ये टिकले. सन २०१४मध्ये काँग्रेसने कलमाडी यांना निलंबित केल्यानंतर त्यांचा राजकीय अस्त झाला व गेल्याच महिन्यात ते काळाच्या पडद्याआड गेले.
अजित पवार यांनी सन १९९७मध्ये प्रा. रामकृष्ण मोरे यांच्या नेतृत्वाला आव्हान देऊन पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कारभारावर ताबा मिळवून कारभारीपद मिळविले. सन २००२नंतर पुण्याच्या राजकारणामध्ये त्यांनी लक्ष घातले, तरीही त्यांना दुय्यम भूमिका स्वीकारावी लागली. मात्र, सन २००७मध्ये कलमाडींच्या काँग्रेसला एकटे पाडताना अजित पवार यांनी भाजप व शिवसेनेला बरोबर घेऊन ‘पुणे पॅटर्न’ राबविला. त्यांच्या या खेळीने त्यांच्याकडे पुण्याचे कारभारीपद आले, ते पुढील सात वर्षे कायम राहिले.
अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार; बारामतीत उसळला जनसागर, त्या क्षणाचे काही फोटो
सन २०१४च्या विधानसभा निवडणुकीनंतर गिरीष बापट राज्यात मंत्री झाले आणि पाठोपाठ पुण्याचे पालकमंत्रीही. महापालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असली, तरीही बापटांचा शब्द अंतिम ठरू लागला व पुण्याचे कारभारीपद त्यांच्याकडे गेले. सन २०१७च्या महापालिकेच्या निवडणुकीत बापट यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे ९७ नगरसेवक निवडून आल्याने त्यांच्या कारभारीपदावर शिक्कामोर्तब झाले.
बापट सन २०१९मध्ये खासदार झाल्यानंतरही त्यांचे महापालिका व शहरातील राजकारणावर बारीक लक्ष असायचे, ते अखेरपर्यंत. मात्र, प्रकृतीने साथ न दिल्याने त्यांचे सन २०२३मध्ये निधन झाले व पुण्याचे कारभारीपद रिक्त झाले. अजित पवार सन २०१९मध्ये पुण्याचे पालकमंत्री झाले व त्यांनी पुन्हा कारभारीपदाची सूत्रे ताब्यात घेतली. पुणे महापालिकेवर निर्विवाद सत्ता नसली, तरीही त्यांच्या म्हणण्याला पालकमंत्रिपदामुळे वजन प्राप्त झाले होते. उद्धव ठाकरे यांचे सरकार पडल्यानंतर वर्षभर अजित पवार या पदापासून लांब होते. पण फडणवीस सरकारमध्ये पुन्हा उपमुख्यमंत्रिपद मिळवून त्यांनी पुण्यात लक्ष घालण्यास प्रारंभ केला.
नुकत्याच झालेल्या निवडणुकीत अजित पवार यांनी पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेवर लक्ष केंद्रीत केले होते. पण या दोन्ही शहरांतील नागरिकांनी त्यांना कौल दिला नाही. त्यामुळे पुण्याला नवीन कारभारी येणार, हे स्पष्ट झाले होते. ती प्रक्रिया सुरू असतानाच आज अजित पवार यांचे निधन झाल्याने आता त्या जागेवर कोण, याची चर्चा सुरू आहे. केंद्रात राज्यमंत्री असलेले मुरलीधर मोहोळ आणि राज्यात मंत्री असलेले चंद्रकांत पाटील यांच्याकडे पुण्याचे संभाव्य कारभारी म्हणून पाहिले जात असले, तरीही त्यांना आपले कारभारीपण सिद्ध करावे लागणार आहे. तीच स्पर्धा पिंपरी- चिंचवडमध्ये महेश लांडगे व शंकर जगताप यांच्यात आहे. अजित पवार यांच्या निधनामुळे धक्का बसलेल्या पुणेकरांमध्ये यापुढे यातील नक्की कोण कारभारी होणार, याचं उत्तर काळच देईल अशीच चर्चा दिवसभर सुरू होती.
