Jadhavar Science Festival : विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मानवी कल्याण, पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकास साधण्याच्या उद्देशाने विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध नाविन्यपूर्ण व समाजोपयोगी संकल्पनांचा आविष्कार ७ व्या जाधवर विज्ञान महोत्सवात पाहायला मिळाला. या महोत्सवात विद्यार्थ्यांनी आपल्या प्रयोगशीलतेतून विज्ञानाचे प्रत्यक्ष उपयोग सांगितले. कृत्रिम बुद्धिमत्ता, पर्यावरणीय शाश्वतता, कचऱ्यापासून संपत्ती निर्मिती, आपत्ती व्यवस्थापन, सायबर सुरक्षा, स्मार्ट रुग्णालय संकल्पना यांसारख्या आधुनिक विषयांवरील प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले.
प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय व डॉ. सुधाकरराव जाधवर इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी आणि इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग, विज्ञान विभाग यांच्या वतीने तसेच विद्यार्थी विकास मंडळ, विज्ञान विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या सहकार्याने ‘सातव्या जाधवर सायन्स फेस्टिव्हल’ या राज्यस्तरीय विज्ञान महोत्सवाचे आयोजन न-हे येथील डॉ. सुधाकरराव जाधवर शैक्षणिक संकुल – १ येथे करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ ए.जी. नगरकर, मनीषा हवालदार, योगेश्वरी महाजन, संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. शार्दुल जाधवर आदी उपस्थित होते.
सायन्स अँड टेक्नॉलॉजी फॉर सोसायटी ही यंदाच्या महोत्सवाची मुख्य संकल्पना होती. महोत्सवामधील स्पर्धा शालेय (इयत्ता ८ वी ते १० वी), कनिष्ठ (इयत्ता ११ वी व १२ वी), वरिष्ठ महाविद्यालय (पदविका शिक्षण) आणि पदव्युत्तर व खुल्या अशा चार गटात स्पर्धा झाली. विजेत्यांना एकूण १ लाख रुपयांपेक्षा अधिकची पारितोषिके व ट्रॉफी देण्यात येणार आहेत.
ए.जी. नगरकर म्हणाले, आपण कमी आहोत असे विद्यार्थ्यांनी समजू नये. आपण सर्वोत्तम आहोत असा विचार करायला पाहिजे. देशासाठी आपण काय करु शकतो, याचा विचार करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी योग्य मार्गाने जाऊन काम करा आणि जे काम करतोय त्यामध्ये समर्पित काम करणे आवश्यक आहे. नवनवे प्रयोग करताना अभ्यासाकडे दुर्लक्ष करु नका, असेही त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
BJP-MIM Alliance : मोठी बातमी! अकोटमधील भाजप – MIM युती तुटली
अॅड. शार्दुल जाधवर म्हणाले, ‘जाधवर सायन्स फेस्टिवल’ च्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला व्यासपीठ मिळावे विज्ञान विषयाची विद्यार्थ्यांना आवड निर्माण व्हावी यासाठी संशोधन करणा-या विद्यार्थ्यांना १० लाख रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येते. भारताबाहेरील इतर देशांमध्ये संशोधन करुन पेटंट मिळविण्याचे प्रमाण अधिक आहे. भारतामध्ये संशोधन व पेटंटचे प्रमाण कमी असून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याकरिता जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटने अभिनव योजना सुरु केली आहे. इन्स्टिटयूटमधील संशोधन करणा-या विद्यार्थ्याला विनातारण १० लाख रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. याद्वारे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान व तंत्रज्ञान विषयाची गोडी निर्माण होत अधिकाधिक संशोधनास युवावर्ग प्रवृत्त होईल.
