Asian Games 2026 India wins a silver medal after forty four years Army man Sawan Barwal’s feat in the men’s marathon : 2026च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या पदकतालिकेत सातत्याने भर पडत आहे. ऐची-नागोया येथे सुरू असलेल्या स्पर्धेच्या सातव्या दिवशी भारताने चांगली सुरुवात केली. दिवसातील पहिल्याच स्पर्धेत भारताच्या खात्यात पदक जमा झाले. पुरुषांच्या मॅरेथॉनमध्ये भारतीय धावपटू सावन बरवालने रौप्यपदकावर नाव कोरले. त्यानंतर महिलांच्या 50 मीटर रायफल थ्री-पोझिशन प्रकारात आशी चौकसे, तिलोत्तमा सेन आणि विदर्शा विनोद या भारतीय त्रिकुटाने रौप्यपदकाची कमाई केली.
‘आर्मी मॅन’ सावन बरवालची ऐतिहासिक कामगिरी
भारतीय लष्करात हवालदार म्हणून कार्यरत असलेल्या सावन बरवालने 2 तास 11 मिनिटे 37 सेकंद अशी वेळ नोंदवत मॅरेथॉन पूर्ण केली. विशेष म्हणजे, या कामगिरीसह त्याने स्वतःच्या नावावर असलेला राष्ट्रीय विक्रमही मोडला. आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुषांच्या मॅरेथॉनमध्ये भारताला तब्बल 44 वर्षांनंतर पदक मिळाले आहे. सातव्या दिवसाच्या कार्यक्रमाची सुरुवात पुरुषांच्या 42 किलोमीटर मॅरेथॉनने झाली. शर्यतीच्या मोठ्या भागात सावन आघाडीवर होता. मात्र अंतिम टप्प्यात काही धावपटूंनी त्याला मागे टाकले. तरीही त्याने शेवटपर्यंत प्रयत्नांची पराकाष्ठा करत रौप्यपदकावर कब्जा केला.
सुवर्णसंधी! 29 सप्टेंबरला राज्यभर रोजगार महाकुंभ, संपर्क कसा करणार? जाणून घ्या
सावनने सुवर्णपदकासाठी जोरदार प्रयत्न केले. मात्र अंतिम निकालात त्याला सुवर्णापेक्षा 48 सेकंदांनी मागे राहावे लागले. त्याने 2:11:37 अशी वेळ नोंदवत रौप्यपदक जिंकले. त्याचवेळी एप्रिलमध्ये स्वतःच्या नावावर नोंदवलेला राष्ट्रीय विक्रमही त्याने सुधारला. 1982च्या नवी दिल्ली आशियाई क्रीडा स्पर्धेनंतर पुरुषांच्या मॅरेथॉनमध्ये भारताला मिळालेले हे पहिले पदक ठरले आहे. त्यामुळे सावनची ही कामगिरी भारतीय अॅथलेटिक्ससाठी विशेष महत्त्वाची मानली जात आहे.
नेमबाजीतही भारताला रौप्यपदक
मॅरेथॉननंतर नेमबाजीमध्येही भारताने पदकाची कमाई केली. महिलांच्या रायफल थ्री-पोझिशन प्रकारात आशी चौकसे, तिलोत्तमा सेन आणि विदर्शा विनोद यांच्या भारतीय संघाने 1763 गुणांसह दुसरे स्थान मिळवत रौप्यपदक जिंकले. या कामगिरीचा वैयक्तिक स्पर्धेतही फायदा झाला. तिलोत्तमा सेन आणि विदर्शा विनोद यांनी याच प्रकाराच्या वैयक्तिक अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवली. मात्र आशी चौकसेला वैयक्तिक प्रकाराच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवता आला नाही. सावन बरवालच्या मॅरेथॉनमधील ऐतिहासिक कामगिरीनंतर नेमबाजीतील रौप्यपदकामुळे सातव्या दिवशी भारताच्या पदकतालिकेत आणखी भर पडली आहे.
