Michael Clarke News : क्रिकेटविश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज मायकल क्लार्कला (Michael Clarke) स्किन कॅन्सरचे निदान झाले आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहीत त्याने याबाबत (Skin Cancer) माहिती दिली. नाकावरील आणखी एक गाठ काढून टाकली असे त्याने या पोस्टमध्ये म्हटले आहे. सुरुवातीच्या टप्प्यातील आजाराचे निदान आणि त्यानंतर नियमित तपासणी जीवन वाचवू शकते असे क्लार्कने म्हटले आहे.
क्लार्कने नेमकं काय सांगितलं
स्किन कॅन्सर वास्तविक आहे. विशेष करून ऑस्ट्रेलियात. आज माझ्या नाकावरील कॅन्सरची आणखी एक गाठ काढण्यात आली. माझ्यासाठी हा एक फ्रेंडली रिमाइंडर होता. नियमितपणे त्वचेची तपासणी करा यासाठीच हा रिमाइंडर होता असं मला वाटतं. माझ्याबाबतीत नियमित तपासणी आणि सुरुवातीलाच आजाराचे निदान खूप महत्वाचं आहे. डॉ. बिश सोलिमान यांचा मी आभारी आहे. कारण त्यांनी वेळेतच या आजाराचे निदान केले.
मोठी बातमी! आशिया कप स्पर्धेतील सर्व सामने मोफत; हॉकी इंडियाचा मोठा निर्णय
क्लार्कसाठी हा आजार नवा नाही. याआधी 2006 मध्ये त्याला पहिल्यांदा या आजाराचे निदान झाले होते. यानंतर 2019 मध्ये तीन नॉन मेलेनोमा लीजनचे निदान झाले होते. यावेळी क्लार्कने लोकांना आवाहन केले होते की कडाक्याच्या उन्हापासून बचाव करण्यासाठी अतिरिक्त खबरदारी घ्या आणि त्वचेची नियमित तपासणी करत राहा.
क्लार्कची क्रिकेट कारकिर्द शानदार
क्लार्क ऑस्ट्रेलिया संघात होता तेव्हा तो त्यांच्या फलंदाजीसाठी ओळखला जायचा. फलंदाजीची त्याची शैली खास होती. क्लार्कने 2003 पासून 2015 पर्यंत ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधीत्व केले. याकाळात त्याने एकूण 115 कसोटी सामन्यांत 8643 धावा केल्या. तसेच 245 एकदिवसीय सामन्यांत 7981 तर 34 टी 20 सामन्यांत 488 धावा केल्या. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात त्याने काही काळ टीमचे कर्णधारपदही सांभाळले होते.
क्लार्कने 47 कसोटी, 74 एकदिवसीय आणि 18 टी 20 सामन्यांत ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केले. त्यांच्या कप्तानीत ऑस्ट्रेलियाने 2015 मधील वर्ल्डकप देखील जिंकला होता. आक्रमक रणनिती आणि झुंजारू वृत्ती यामुळे क्लार्क ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूंत गणला जातो.
स्किन कॅन्सर कशामुळे होतो
असामान्य त्वचा पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे त्वचेचा कॅन्सर होतो. सूर्यातून येणारी अल्ट्राव्हायलेट किरणे किंवा टॅनिंग बेडचा जास्त वापर केल्याने हा आजार होतो. जगभरात हा आजार कॉमन आहे. या आजाराच्या सुरुवातीच्या टप्प्यात निदान आणि त्यानंतर योग्य उपचार मिळाले तर आजार आटोक्यात आणता येतो. जगात ऑस्ट्रेलियात स्किन कॅन्सरचे प्रमाण सर्वाधिक आहे. येथे सूर्याच्या अल्ट्राव्हायलेट किरणांची उच्च पातळी, भूमध्य रेषेच्या जवळ असणे तसेच देशात गौरवर्णीय लोकसंख्या. यामुळे ऑस्ट्रेलियात स्किन कॅन्सरचे प्रमाण अन्य देशांच्या तुलनेत खूप जास्त आहे.
