टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेपूर्वी भारतीय (India) संघ न्यूझीलंड संघाविरूद्ध पाच सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. ही मालिका टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वीची लिटमस टेस्ट आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेला आता फक्त दीड महिन्यांचा अवधी शिल्लक असताना टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये दोन वर्षांपासून टीम इंडियापासून दूर असलेला इशान किशन पुन्हा निळ्या जर्सीत दिसणार आहे.
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये इशानने अक्षरशः धुमाकूळ घातला. तो या स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला, तसेच 500 हून अधिक धावा करत झारखंडला जेतेपद मिळवून देण्यात त्याचा मोलाचा वाटा होता. त्याची आक्रमक फलंदाजी, सातत्य आणि नेतृत्वगुण लक्षात घेता निवड समितीने त्याच्यावर पुन्हा विश्वास दाखवला आहे.
शुभमन गिलला डच्चू; इशान किशनचे कमबॅक ! अक्षर पटेल उपकर्णधार, टी-20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा
त्याचबरोबर एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करणारा गिल मात्र टी-20 प्रकारात अपेक्षित सातत्य राखू शकलेला नाही. गेल्या काही काळातील कमकुवत फॉर्म आणि प्रभावहीन कामगिरीमुळे निवड समितीने त्याला 2026 च्या टी-20 विश्वचषक संघातून वगळण्याचा कठोर निर्णय घेतला आहे.
झारखंडचा कर्णधार इशान किशनने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात धमाकेदार शतक ठोकून खळबळ उडवून दिली होती. किशनने अंतिम सामन्यात हरियाणाविरुद्ध 101 धावांची दमदार खेळी केली. या खेळीदरम्यान इशान किशनने संजू सॅमसनचा विक्रम मोडत अनेक विक्रम प्रस्थापित केले. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 ही इशानसाठी उल्लेखनीय कामगिरी होती. त्याने केवळ कर्णधार म्हणूनच नव्हे तर फलंदाज म्हणूनही असाधारण कामगिरी केली. या हंगामात त्याने खेळलेल्या 10 सामन्यांमध्ये इशानने एकूण 262 चेंडूंचा सामना करत 517 धावा केल्या. त्याची सरासरी 57.44 होती, तर त्याचा स्ट्राईक रेट 197.32 होता. या सामन्यांमध्ये इशानने 51 चौकार आणि 33 षटकार मारले.
बाहेर का ठेवलं होतं?
2023 साली टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता. या दौऱ्यात ईशान किशन संघाचा भाग होता. मात्र वैयक्तिक कारणांचा हवाला देत त्याने कसोटी मालिकेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्याने रणजी ट्रॉफीही खेळली नाही आणि काही काळासाठी देशांतर्गत क्रिकेटपासून दूर राहिला.
या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने त्याच्याविरोधात कडक पाऊल उचलत त्याला सेंट्रल कॉन्ट्रॅक्टच्या यादीतून वगळले. मात्र ईशान किशनने देशांतर्गत क्रिकेटमध्ये जोरदार पुनरागमन करत आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सातत्यपूर्ण आणि दमदार प्रदर्शनाच्या जोरावर त्याने पुन्हा एकदा टीम इंडियात आपली जागा पक्की केली.
