Download App

WCL च्या मैदानावर मोठा ट्विस्ट! भारत-पाक मॅच रद्द होणार? प्रायोजकांची माघार, धक्कादायक कारण…

WCL 2025 India VS Pakistan Semifinal : वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स (WCL) 2025 या बहुचर्चित क्रिकेट लीगला मोठा धक्का बसला आहे. 31 जुलै रोजी होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान (India VS Pakistan Semifinal) यांच्यातील पहिल्या सेमीफायनल सामन्यापूर्वी मुख्य प्रायोजक EaseMyTrip या कंपनीने या सामन्याशी संबंधित असण्यास नकार दिला आहे. या निर्णयामुळे लीगच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण (Cricket News) झालंय. सामना होणार की नाही? याबाबतही साशंकता निर्माण झाली आहे.

दहशतवादी हल्ल्यानंतर कठोर निर्णय

EaseMyTrip कंपनीने या निर्णयामागचे कारण स्पष्ट करताना म्हटलंय की, दहशतवाद आणि क्रिकेट यांचा एकत्रितपणा अस्वीकार्य आहे. अलीकडेच जम्मू-काश्मीरच्या पहलगाम भागात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर कंपनीचे सह-संस्थापक निशांत पिट्टी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या सामन्यातून माघार घेण्याची घोषणा केली. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, EaseMyTrip दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या देशाशी संबंधित कोणत्याही कार्यक्रमाचे समर्थन करू शकत नाही.

काँग्रेसच्या नव्या रणनितीची सुरुवात! सपकाळ टीमला दिल्लीतून हिरवा झेंडा

EaseMyTrip च्या सह-संस्थापकांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय की, विश्व चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्समध्ये टीम इंडियाची कामगिरी आम्हाला अभिमान देणारी आहे. पण पाकिस्तानविरुद्धचा सेमीफायनल हा एक सामान्य सामना नाही. काही गोष्टी खेळांपेक्षा मोठ्या असतात. देश आधी, व्यवसाय नंतर – हेच आमचं धोरण आहे. हा निर्णय चाहत्यांच्या भावना लक्षात घेऊनच घेण्यात आलाय. चाहत्यांनी त्यांचे विचार मोकळेपणाने मांडले. आम्ही त्यांच्या भावना समजून घेतल्या. आमचं कर्तव्य आहे की, देशाच्या सुरक्षेशी संबंधित कोणत्याही बाबतीत ठाम भूमिका घेणं.

लग्नाचे योग, नोकरीत प्रमोशन; आज ‘या’ तीन राशींना करिअरमध्ये छप्पर फाड यश

भारत-पाकिस्तान संबंधांवर पुन्हा चर्चेची ठिणगी

EaseMyTrip या प्रमुख प्रायोजकाच्या माघारीमुळे WCL 2025 मधील भारत-पाकिस्तान पहिला सेमीफायनल सामना होणार की नाही, यावर सध्या अनिश्चिततेचे सावट आहे. याआधी 20 जुलै रोजी देखील काही भारतीय माजी क्रिकेटपटूंनी पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास स्पष्ट नकार दिला होता. परिणामी, त्या वेळी नियोजित लीग सामना रद्द करण्यात आला होता. त्यानंतर WCL च्या आयोजकांनी भारतीय चाहत्यांची माफीही मागितली होती.

EaseMyTrip चा निर्णय केवळ क्रिकेटच्या पातळीपुरताच मर्यादित नाही, तर भारत-पाकिस्तान संबंधांबाबत चालू असलेल्या व्यापक चर्चेला नव्या दिशा देणारा ठरतोय. खेळाच्या माध्यमातून दोन देशांतील तणाव निवळावा, अशी एक बाजू असली, तरी दुसरीकडे देशाच्या सुरक्षेशी आणि शहीदांच्या बलिदानाशी संबंधित भावनिक मुद्देही प्रबळपणे समोर येतात. EaseMyTrip च्या माघारीनंतर आता इतर प्रायोजक आणि खेळाडूंच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. WCL 2025 च्या आयोजकांकडून अद्याप या विषयावर अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

follow us