पुणे : भारतीय क्रिकेट संघ मंगळवारी (17 जानेवारी) अचानक कसोटी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला. हे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. रँकिंग पाहून भारतीय चाहत्यांना आनंद झाला, पण त्यांचा आनंद अल्पकाळ टिकला. आयसीसीने साडेतीन तासांनंतरच भारताला पहिल्या स्थानावरून दूर केले. जेव्हा हे घडले तेव्हा लोक शोधू लागले की टीम इंडिया काही काळासाठी शीर्षस्थानी कशी गेली. या प्रकरणात ते आयसीसीच्या चुकीमुळे झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
आयसीसीने ऑस्ट्रेलियाला 126 गुण देण्याऐवजी 111 रेटिंग गुण दिले. त्याचवेळी भारताला 115 गुण देण्यात आले होते. यामुळे कांगारू संघ दुसऱ्या स्थानावर घसरला. 17 जानेवारी रोजी सकाळी आठ वाजता ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या क्रमांकावर होता. दुपारी दीड वाजता भारत पहिल्या स्थानावर पोहोचला. त्याच वेळी, आयसीसीने दुपारी 4 वाजता चूक सुधारली, तेव्हा ऑस्ट्रेलिया पुन्हा शीर्षस्थानी आला आहे.
मात्र, भारतीय संघाला लवकरच पहिले स्थान मिळू शकते. त्याला फेब्रुवारी-मार्चमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4 कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. टीम इंडियाने ही मालिका 2-0 किंवा 3-1 अशी जिंकली तर कसोटीत अव्वल स्थान गाठू शकणार आहे.
जर भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धची एकदिवसीय मालिका 3-0 ने जिंकली आणि त्यानंतर टी-20 मालिका कोणत्याही फरकाने जिंकली आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिकाही जिंकली तर टीम इंडिया तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर-1 बनेल.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना 9 फेब्रुवारीपासून नागपुरात खेळवला जाणार आहे. दुसरी कसोटी 17 फेब्रुवारीपासून दिल्लीत, तिसरी कसोटी 1 मार्चपासून धरमशाला आणि चौथी कसोटी 9 मार्चपासून अहमदाबादमध्ये खेळवली जाणार आहे. यानंतर टीम इंडिया तीन वनडेही खेळणार आहे. पहिला एकदिवसीय सामना 17 मार्चला मुंबईत, दुसरा एकदिवसीय सामना 19 मार्चला विशाखापट्टणममध्ये आणि तिसरा एकदिवसीय सामना 22 मार्चला चेन्नईत खेळवला जाणार आहे.