भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये आजचा दिवस ऐतिहासीक ठरला. (Sports) आज झालेल्या रणजी ट्रॉफी 2025-26 च्या अंतिम सामन्यात जम्मू आणि काश्मीरने बलाढ्य कर्नाटक संघावर मात करत पहिल्यांदाच रणजी चषकावर आपले नाव कोरलं. यामध्ये विशेष म्हणजे पहिल्यांदा जम्मू-काश्मीरच अंतिम फेरीत पोहचला होता. कर्णधार पारस डोग्राने आपला डाव घोषित केला आणि नियमांनुसार संघाला विजयी घोषित केलं. रणजी ट्रॉफीच्या नियमानुसार, जर 5 दिवसांचा खेळ संपल्यानं
तरही सामन्याचा निकाल लागला नाही, तर ज्या संघाने पहिल्या डावात जास्त धावा केल्या असतात, त्या संघाला विजयी घोषित केलं जातं. येथे जम्मू-काश्मीरने पहिल्या डावात मोठी आघाडी घेतली होती, त्यामुळे सामना ड्रॉ होऊनही नियमांच्या आधारे रणजी ट्रॉफीवर जम्मू-काश्मीर संघाच नाव कोरलं गेलं. कसोटी क्रिकेटमध्ये 5 दिवस खेळूनही निकाल लागला नाही तर तो सामना ड्रॉ मानला जातो, पण फायनलमध्ये एकाला तरी विजेता घोषित करणं गरजेचं असतं.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या जम्मू-काश्मीर संघाने पहिल्या डावात तब्बल 584 धावा करत प्रतिस्पर्ध्यांपुढे मोठे आव्हान उभे केले. दुसऱ्या विकेटसाठी शुभम पुंडीर आणि यावर हसन यांनी 139 धावांची भागीदारी करत संघाचा पाया मजबूत केला. यावर 88 धावांवर बाद झाला, पण त्यानंतर शुभमने अब्दुल समदच्या साथीने चौथ्या विकेटसाठी आणखी 124 धावा जोडल्या. शुभम पुंडीरने 14 चौकारांसह शानदार 121 धावांची खेळी साकारली, तर अब्दुल समदने 61 धावांचे मोलाचे योगदान दिले.
विधानसभा निवडणूक तारखांची प्रतीक्षा; IPL 2026 वेळापत्रकावर अनिश्चिततेचे सावट
कर्णधार पारस डोगराने 70 धावा करत नेतृत्वाची जबाबदारी समर्थपणे पार पाडली, तर साहिल लोत्रानेही 72 धावांची उपयुक्त खेळी केली. कर्नाटक संघाकडून प्रसिद्ध कृष्णाने 5 विकेट घेत प्रभावी गोलंदाजी केली. तसेच विद्याधर पाटील, विजयकुमार विशाक, श्रेयस गोपाल आणि शिखर शेट्टी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
पहिल्या डावात फलंदाजीसाठी उतरलेल्या कर्नाटकच्या संघाची सुरुवात अत्यंत निराशाजनक ठरली. जम्मू-काश्मीरचा वेगवान गोलंदाज औकिब नबीने अचूक मारा करत कर्नाटकच्या वरच्या फळीची अक्षरशः कंबर मोडली. स्टार फलंदाज केएल राहुल (13) याला माघारी धाडल्यानंतर त्याने करुण नायर आणि स्मरण आर यांनाही खाते न उघडताच पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
औकिबच्या या भेदक गोलंदाजीमुळे कर्नाटकवर सुरुवातीपासूनच दबाव निर्माण झाला. त्यातच सुनील कुमारने देवदत्त पडिक्कलचा बळी घेत कर्नाटकच्या अडचणीत भर टाकली. एकीकडे विकेट्स पडत असताना कर्णधार मयंक अग्रवालने दुसरा टोक सांभाळत शानदार शतक झळकावले आणि डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र औकिब नबीने त्यालाही 160 धावांवर रोखत पुन्हा कर्नाटकला मोठा धक्का दिला.
अखेर कर्नाटकचा संपूर्ण डाव 293 धावांवर आटोपला. औकिब नबीने अप्रतिम गोलंदाजी करत 23 षटकांत 7 निर्धाव षटके टाकत 54 धावांत 5 बळी घेतले आणि सामन्यावर ठसा उमटवला. पहिल्या डावात 291 धावांची भक्कम आघाडी मिळूनही जम्मू-काश्मीरने फॉलोऑन न देण्याचा निर्णय घेतला होता.
दुसऱ्या डावात जम्मू आणि काश्मीरकडून कामरान इक्बाल आणि साहिल लोत्रा यांनी शतके झळकावली. यावर हसन 1 धावांवर बाद झाला होता, परंतु सलामीवीर कामरानने डाव सावरला. दुसऱ्या डावात जम्मू आणि काश्मीरने 4 बाद 342 धावा केल्या. कामरानने नाबाद 160 धावा केल्या, तर साहिलने नाबाद 101 धावा केल्या. पाचव्या दिवशी दुपारच्या जेवणानंतर कर्णधार पारस डोग्राने आपला डाव घोषित केला आणि नियमांनुसार संघाला विजयी घोषित करण्यात आले.
