वनडे विश्वचषक 2027 चा नवा फॉरमॅट जाहीर, सुपर सिरीज आणि सुपर 7 मुळे वाढणार थरार

2023 च्या विश्वचषकाच्या तुलनेत यंदाचा फॉरमॅट पूर्णपणे वेगळा असणार असून, त्यात सुपर सिरीज आणि सुपर 7 असे नवे टप्पे समाविष्ट करण्यात आले आहेत.

Untitled Design   2026 10 02T131218.474

Untitled Design 2026 10 02T131218.474

New format for the 2027 ODI World Cup announced : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीआयने आगामी वनडे विश्वचषक स्पर्धेसाठी नव्या फॉरमॅटची घोषणा केली असून, या स्पर्धेत पूर्वीपेक्षा अधिक संघ आणि अधिक सामने पाहायला मिळणार आहेत. दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया यांच्या संयुक्त यजमानपदाखाली ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांत ही स्पर्धा रंगणार आहे. विशेष म्हणेज 2023 च्या विश्वचषकाच्या तुलनेत यंदाचा फॉरमॅट पूर्णपणे वेगळा असणार असून, त्यात सुपर सिरीज आणि सुपर 7 असे नवे टप्पे समाविष्ट करण्यात आले आहेत. यंदाच्या विश्वचषकात एकूण 14 संघ सहभागी होणार आहेत.

स्पर्धेचा प्रवास चार प्रमुख टप्प्यांमधून होईल. सुरुवातीला ‘सुपर सिरीज’ खेळवली जाईल. या टप्प्यात पात्र ठरलेल्या 14 संघांपैकी सर्वात कमी क्रमांकावर असलेल्या तीन संघांमध्ये चुरशीची मालिका होईल. या मालिकेत अव्वल स्थान पटकावणारा संघ पुढील फेरीत प्रवेश करेल, तर उर्वरित दोन संघांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल. सुपर सिरीजचा विजेता संघ मुख्य गट फेरीत दाखल होईल. त्यानंतर एकूण 12 संघांमध्ये विश्वचषकाची मुख्य स्पर्धा खेळवली जाईल. या 12 संघांची प्रत्येकी सहा संघांच्या दोन गटांमध्ये विभागणी केली जाईल.

प्रत्येक संघ आपल्या गटातील इतर पाच संघांविरुद्ध सामने खेळेल. या टप्प्यानंतर दोन्ही गटांतील अव्वल तीन संघ तसेच उर्वरित संघांपैकी सर्वोत्तम कामगिरी करणारा आणखी एक संघ अशा एकूण सात संघांना सुपर 7 फेरीचे तिकीट मिळेल. विश्वचषकातील सर्वाधिक रोमांचक टप्पा म्हणून सुपर 7 कडे पाहिले जात आहे. या फेरीत पात्र ठरलेले सातही संघ एकमेकांविरुद्ध प्रत्येकी एक सामना खेळतील. त्यामुळे प्रत्येक संघाला सहा सामने खेळावे लागतील. या टप्प्यानंतर गुणतालिकेतील अव्वल चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.

साखरेच्या किंमती घसरणार? वाढत्या दराच्या पार्श्वभूमीवर सरकारने उचललं मोठं पाऊल

यानंतर स्पर्धा नॉकआऊट टप्प्यात प्रवेश करेल. गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवणारा संघ चौथ्या क्रमांकाच्या संघाशी, तर दुसऱ्या क्रमांकावरील संघ तिसऱ्या क्रमांकाच्या संघाशी उपांत्य फेरीत भिडेल. या दोन्ही सामन्यांतील विजेते संघ अंतिम फेरीत आमनेसामने येतील आणि त्यातून 2027 चा विश्वविजेता ठरेल. या नव्या रचनेमुळे अंतिम फेरी गाठणाऱ्या संघाला मोठा प्रवास करावा लागणार आहे. गट फेरीपासून अंतिम सामन्यापर्यंत पोहोचण्यासाठी एखाद्या संघाला एकूण 13 सामने खेळावे लागू शकतात. यामध्ये पाच गट सामने, सहा सुपर 7 सामने, एक उपांत्य सामना आणि अंतिम सामना यांचा समावेश असेल.

त्यामुळे संघांच्या सातत्यपूर्ण कामगिरीची आणि बेंच स्ट्रेंथची खरी कसोटी लागणार आहे. 2023 च्या विश्वचषकात केवळ 10 संघ सहभागी होते आणि सर्व संघ एकाच लीग टप्प्यात खेळत होते. त्यानंतर थेट उपांत्य फेरी आणि अंतिम सामना असा फॉरमॅट होता. मात्र, 2027 मध्ये संघसंख्या 14 पर्यंत वाढवण्यात आली असून, अधिक संघांना जागतिक स्तरावर स्वतःची क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे. तसेच सुपर सिरीज आणि सुपर 7 मुळे स्पर्धेतील प्रत्येक टप्प्यावर चुरस कायम राहणार आहे. क्रिकेटप्रेमींसाठी हा विश्वचषक केवळ मोठा नाही, तर अधिक स्पर्धात्मक आणि रोमांचक ठरण्याची शक्यता आहे. नव्या फॉरमॅटमुळे बलाढ्य संघांसोबतच उदयोन्मुख संघांनाही मोठी संधी मिळणार असून, 2027 चा विश्वचषक वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात रंगतदार स्पर्धांपैकी एक ठरू शकतो.

Exit mobile version