Download App

‘शिखर’नंतर या 11 खेळाडूंचंही होणार पॅकअप; संघात संधीच नाही, फक्त घोषणाच बाकी

शिखर धवनप्रमाणेच आणखी काही भारतीय खेळाडू (Indian Cricketers) लवकरच निवृत्ती जाहीर करू शकतात.

Team india cricketers : टीम इंडियाचा माजी सलामीवीर खेळाडू शिखर धवनने (Shikhar Dhawan) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. तसाही धवन बऱ्याच दिवसांपासून संघाबाहेर (Team India) होता. टी 20 वर्ल्डकपमध्येही त्याला संधी मिळाली नाही. अखेर दोन दिवसांपूर्वी त्याने क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली. शिखर धवनप्रमाणेच आणखी काही भारतीय खेळाडू (Indian Cricketers) लवकरच निवृत्ती जाहीर करू शकतात. कारण हे खेळाडू बऱ्याच वर्षांपासून संघात नाहीत. त्यांच्यात क्षमता आहे मात्र संघात त्यांची निवड होत नाही. भविष्यातही त्यांना संघात घेतले जाईल याची शक्यता खूप कमी आहे. त्यामुळे निवृत्ती जाहीर करण्याशिवाय त्यांच्या समोर आता दुसरा पर्याय राहिलेला नाही.

पियूष चावला

35 वर्षांचा फिरकी गोलंदाज पियूष चावला 2011 मधील वर्ल्डकप मध्ये भारतीय संघाचा हिस्सा होता. सप्टेंबर 2012 मध्ये पियुषने भारतीय संघासाठी क्रिकेट खेळले होते. पियूषने त्याच्या कारकीर्दीत एकूण तीन कसोटी, 25 वनडे आणि 7 टी 20 सामने खेळले आहेत. 2024 मधील आयपीएल हंगामात पियूष चावला मुंबई संघात होता.

ऋद्धीमान सहा

महेंद्र सिंह धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर ऋद्धीमान सहाला भारतीय संघात विकेटकिपर म्हणून अनेक संधी मिळाल्या होत्या. नंतर मात्र सहाच्या करिअरला उतरती कळा लागली. सन2021 मध्ये सहाने न्युझीलंड विरुद्ध अखेरचा क्रिकेट सामना खेळला होता. 40 कसोटी आणि 9 वनडे सामने खेळलेला सहा आता 39 वर्षांचा झाला आहे. केएस भरत, इशान किशन, ध्रुव जुरेल, ऋषभ पंत यांच्यामुळे आता साहा साठी टीम इंडियाचे दरवाजे पूर्णपणे बंद झाले आहेत.

इशांत शर्मा

एकेकाळी इशांत शर्मा भारतीय कसोटी संघाचा महत्त्वाचा गोलंदाज होता. पण आता त्याचं करिअर संपल्यात जमा आहे. इशांतने भारतीय संघात असताना एकूण 102 कसोटी, 80 वनडे आणि 14 टी 20 सामने खेळले आहेत. इशांतने कसोटीमध्ये 311 विकेट्स घेतल्या आहेत. वनडे सामन्यांमध्ये 115 आणि टी 20 मध्ये 8 विकेट्स घेतल्या आहेत. नोव्हेंबर 2021 मध्ये इशांतने अखेरचा कसोटी सामना खेळला होता. आता 35 वर्षीय इशांत क्वचितच संघात परतू शकतो. कारण संघ व्यवस्थापन आणि युवा खेळाडूना जास्तीत जास्त संधी देत आहे.

मोठी बातमी! टी 20 वर्ल्डकपचं वेळापत्रक चेंज, भारताच्या सामन्यात बदल; बांग्लादेशची संधी हुकलीच..

अमित मिश्रा

डाव्या हाताने लेग ब्रेक गोलंदाजी करणारा अमित मिश्रा बऱ्याच काळापासून संघाबाहेर आहे. 2017 मध्ये अमित मिश्रा भारतीय संघात होता. त्यावेळी इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात तो मैदानात उतरला होता. 41 वर्षीय अमित मिश्राने भारतीय संघात असताना 22 कसोटी, 36 वनडे आणि 10 टी 20 सामने खेळले आहेत. या सर्व सामन्यांत त्याने एकूण 156 विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएलच्या मागील हंगामात अमित मिश्रा लखनऊ संघात होता.

करुण नायर

कसोटी क्रिकेटमध्ये वीरेंद्र सेहवाग नंतर फक्त करुण नायरनेच त्रिशतक केले आहे. या ट्रिपल सेंच्युरी नंतर करुण नायरचा क्रिकेट ग्राफ घसरत गेला. सन 2017 मध्ये नायरने भारतासाठी अखेरचा सामना खेळला होता. करुण नायर देशांतर्गत क्रिकेटमध्येही जास्त खेळताना दिसत नाही. अशा परिस्थितीत आता त्याची टीम इंडियात वापसी होईल याची काहीच शक्यता राहिलेली नाही. करुण नायरने फक्त सहा कसोटी आणि दोन एकदिवसीय सामने खेळले आहेत.

मनीष पांडे

मधल्या फळीतील फलंदाज मनीष पांडेची स्टोरी सुद्धा करुण नायर सारखीच आहे. 34 वर्षीय मनीषला जितक्या संधी मिळाल्या त्याचा फायदा त्याला घेता आला नाही. पांडेने भारतासाठी 29 कसोटी आणि 39 टी 20 सामने खेळले आहेत. पांडेने भारतासाठी अखेरचा सामना जुलै 2021 मध्ये खेळला होता.

ऋषी धवन

हिमाचल प्रदेशचा अष्टपैलू खेळाडू ऋषी धवन सुद्धा भारतीय संघात खेळला आहे. ऋषीने भारतासाठी तीन वनडे आणि एक टी 20 सामना खेळला आहे. या दोन्ही सामन्यांत त्याने प्रत्येकी एक एक विकेट घेतली. 34 वर्षांच्या ऋषी धवनने शेवटचा सामना जून 2016 मध्ये खेळला होता.

मोहित शर्मा

वेगवान गोलंदाज मोहित शर्माने त्याच्या कारकीर्दीत एकूण 26 वनडे आणि 8 टी 20 सामन्यांमध्ये सहभाग घेतला. आपल्या गोलंदाजीत एकदिवसीय सामन्यांमध्ये 31 आणि टी 20 सामन्यांमध्ये 6 विकेट्स घेतल्या. 35 वर्षांच्या मोहितने अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना 2015 मध्ये खेळला होता. आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुन्हा संधी मिळणे त्याच्यासाठी कठीणच आहे. मोहित आयपीएल मध्ये गुजरात संघाकडून खेळतो.

Jay Shah : जय शाहनंतर कोण होणार बीसीसीआय सचिव ? ‘या’ नावांची चर्चा

उमेश यादव

वेगवान गोलंदाज उमेश यादव अनेक दिवसांपासून संघाबाहेर आहे. मागील वर्षांतील जून महिन्यात उमेशने ऑस्ट्रेलिया विरुद्ध अखेरचा सामना खेळला होता. 36 वर्षांच्या उमेशने भारतासाठी आतापर्यंत 57 टेस्ट, 75 वनडे आणि 9 टी 20 सामने खेळले आहेत. कसोटी सामन्यांत त्याने एकूण 170 विकेट्स घेतल्या आहेत. तर वनडे सामन्यांमध्ये उमेशने 106 तर टी 20 मध्ये 12 विकेट्स घेतल्या आहेत.

भुवनेश्वर कुमार

वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार जवळपास दोन वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये भुवीने अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. सन 2013 मध्ये भुवनेश्वर कुमारने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून भुवनेश्वर कुमार सारखा दुखापतींनी त्रस्त आहे. 34 वर्षांच्या भुवीने 21 कसोटी, 121 वनडे आणि 87 टी 20 सामने खेळले आहेत. या दरम्यान त्याने 294 विकेट्स घेतल्या आहेत. आता भारतीय संघात युवा खेळाडूंचा भरणा वाढला आहे त्यामुळे आता भुवनेश्वर कुमारच्या कमबॅकची शक्यता मावळली आहे.

जयंत यादव

डाव्या हाताचा फिरकी गोलंदाज जयंत यादवला भारतीय संघात संधी मिळाली होती. जयंतने सहा कसोटी आणि दोन वनडे सामने खेळले आहेत. त्याने कसोटी सामन्यात एकूण 16 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने फलंदाजी करताना 248 धावा केल्या आहेत. वनडे क्रिकेट मध्ये जयंत यादवने दोन विकेट घेतल्या आहेत. जयंतने मार्च 2022 मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.

follow us