Team India Head Coach : आगामी टी 20 विश्वचषकानंतर टीम इंडियाचा मुख्य कोच कोण असणार (Team India Head Coach) असा मोठा प्रश्न आहे. बीसीसीआय काही नावांवर विचार करत आहे. मात्र अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. यात आता एक मोठी बातमी समोर येत आहे. विश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळावी असा प्रस्ताव भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने गौतम गंभीरला दिल्याची माहिती आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या रिपोर्टमधून ही माहिती समोर आली आहे.
विश्वचषक स्पर्धेनंतर राहुल द्रविड प्रशिक्षक पदाचा राजीनामा देतील. भारतात झालेल्या वनडे विश्वचषक स्पर्धेनंतर त्यांना मुदतवाढ देण्यात आली होती. आता टी 20 विश्वचषकानंतर वाढीव मुदत संपत आहे. त्यामुळे मंडळाने नव्या कोच नियुक्तीसाठी वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत. प्रशिक्षक पदासाठी सोमवारी बीसीसीआयनं अर्ज मागवले. यानंतर क्रिकइन्फोचा अहवाल समोर आला आहे. या अहवालात असे म्हटले आहे की गौतम गंभीरने प्रशिक्षक पदाची जबाबदारी सांभाळावी अशी बीसीसीआयची इच्छा आहे. गंभीर सध्या टी 20 प्रीमियर लीग स्पर्धेत कोलकाता संघाचा मेंटर आहे. याआधी गंभीर लखनऊ संघाचा मेंटर होता.
T20 World Cup : आयसीसीने केली सराव सामन्यांची घोषणा; टीम इंडिया ‘या’ संघाला देणार टक्कर
बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी अलीकडेच स्पष्ट केले होते की क्रिकेटच्या विविध प्रकारांसाठी वेगवेगळे कोच असणार नाहीत. तिन्ही प्रकारांसाठी एकच कोच असेल आणि त्याच्याकडे साडेतीन वर्षांसाठी ही जबाबदारी असेल. टी 20 विश्वचषकानंतर द्रविडचा कार्यकाळ संपणार आहे. आता या पदावर कायम राहायचे असेल तर द्रविडला पुन्हा अर्ज करावा लागेल. अर्ज करण्यासाठी बीसीसीआयनं २७ मे अंतिम मुदत निश्चित केली आहे.
व्हीव्हीएस लक्ष्मण, जस्टिन लँगर आणि गौतम गंभीर या पदासाठी अर्ज करू शकतात. जर लक्ष्मणने अर्ज केला तर तो सर्वात प्रबळ दावेदार ठरेल. लक्ष्मण मागील तीन वर्षांपासून राष्ट्रीय क्रिकेट अॅकॅडमीची कमान सांभाळत आहे. द्रविडच्या गैरहजेरीत लक्ष्मणने भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदाची जबाबदारी सांभाळली आहे. परंतु या रिपोर्टमध्ये असाही दावा करण्यात आला आहे की लक्ष्मण या पदासाठी आघाडीवरील उमेदवार नाहीत.
T20 विश्वचषकात टीम इंडिया ‘या’ दोन संघांविरुद्ध जिंकलीच नाही; यंदाही आव्हान कायम
काही मीडिया रिपोर्ट्सनुसार बीसीसीआयच्या यादीत स्टीफन फ्लेमिंगचे नाव आहे. बीसीसीआयची इच्छा आहे की फ्लेमिंगने भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदाची जबाबदारी सांभाळावी. आता फ्लेमिंग या पदासाठी अर्ज करणार की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कारण यासाठी त्यांना वर्षातील दहा महिने संघाबरोबर राहवे लागणार आहे. रिपोर्ट्सनुसार भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदासाठी फ्लेमिंग योग्य उमेदवार असल्याचे सांगितले जात आहे. आगामी काळात भारतीय संघात मोठे बदल झालेले दिसतील. परिस्थिती हाताळण्याचा मोठा अनुभव स्टीफन फ्लेमिंगकडे आहे. त्यामुळे फ्लेमिंगचीही दावेदारी मजबूत मानली जात आहे.