T 20 World Cup 2024 : टी 20 वर्ल्डकप सुरू होण्यास दोनच दिवस शिल्लक (T20 World Cup 2024) राहिले आहेत. सगळ्याच संघांनी स्पर्धेच्या तयारीला सुरूवात केली आहे. भारतीय संघ न्यूयॉर्कला पोहोचला आहे. संघातील खेळाडूंनी सरावाला सुरुवात केली आहे. याआधी टीम इंडियाने 2007 मध्ये विश्वचषक (Team India) जिंकला होता. त्यानंतर आता पुन्हा विजेता होण्याच्या उद्देशाने भारतीय संघ अमेरिकेत दाखल झाला आहे. रोहित शर्मा टी 20 विजेत्या संघात होता. त्यानंतर आता 2024 मध्ये तो भारतीय संघाचा कर्णधार आहे. भारताने 2013 नंतर आयसीसी ट्रॉफी जिंकलेली नाही. त्यामुळे आता अकरा वर्षांचा हा दुष्काळ संपवण्याची संधी चालून आली आहे. मागील वेळी 2013 मध्ये एम एस धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती.
यंदाच्या भारतीय संघात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत आहे ती म्हणजे संघातील खेळाडूंचं वय. या विश्वचषकात आतापर्यंतचा सर्वाधिक अनुभवी संघ खेळण्यास उतरला आहे. आताच्या भारतीय संघाचं सरासरी वय 30.3 वर्ष आहे. संघातील दहा खेळाडू असे आहेत ज्यांचं वय तीस किंवा त्यापेक्षा जास्त आहे. सन 2007 मध्ये ज्यावेळी भारतीय संघाने विश्वचषक जिंकला होता त्यावेळी नवी टीम इंडिया होती. संघातील एकही खेळाडूचं वय तीस पेक्षा जास्त नव्हतं. या संघात सर्वात जास्त वयाचा एकच खेळाडू होता तो म्हणजे अजित आगरकर. त्यावेळी आगरकरचं वय 29 होतं.
T20 World Cup : आयसीसीने केली सराव सामन्यांची घोषणा; टीम इंडिया ‘या’ संघाला देणार टक्कर
या संघात 18 ते 20 दरम्यानच्या वयाचे दोन खेळाडू होते. 21 ते 25 वयोगटातील नऊ खेळाडू, 26 ते 29 वयोगटातील चार खेळाडू होते. त्यावेळी कर्णधार धोनीचं वय 26 वर्षे होतं. युवराज सिंह 25, वीरेंद्र सेहवाग 28, गौतम गंभीर 25, रोहित शर्मा 20, रॉबिन उथप्पा 21, दिनेश कार्तिक 22, युसुफ पठाण 24, इरफान पठाण 22, हरभजन सिंह 27, पियूष चावला 18, आरपी सिंह 21, एस. श्रीसंत 24 आणि जोगिंदर शर्मा याचं वय 23 वर्षे होतं. या स्पर्धेत धोनी ब्रिगेडने ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड यांसारख्या दिग्गज संघांचा पराभव केला होता.
आता 2024 मधील विश्वचषक संघात 20 वर्षांपेक्षा कमी वयाचा एकही खेळाडू नाही. 21 ते 25 वयोगटातील फक्त एकच खेळाडू संघात आहे तर 26 ते 30 वयोगटातील आठ खेळाडू आहेत. 31 ते 35 वयोगटातील चार खेळाडू आहेत. 36 वर्षांवरील एक खेळाडू संघात आहे. कर्णधार रोहित शर्माच संघातील सर्वाधिक वयाचा खेळाडू आहे. रोहित सध्या 37 वयाचा आहे. विराट कोहली आणि रवींद्र जडेजा 35-35 वर्षांचे आहेत. सूर्य कुमार यादव आणि युजवेंद्रा चहल 33 वर्षांचे आहेत.
T20 World Cup 2024 साठी पाकिस्तानचा संघ जाहीर, ‘या’ स्टार खेळाडूला पुन्हा संधी
उपकर्णधार हार्दिक पंड्या, शिवम दुबे, जसप्रीत बुमराह आणि अक्षर पटेल प्रत्येकी 30 वर्षांचे आहेत. कुलदीप यादव आणि संजू सॅमसन 29-29 वर्षांचे आहेत. ऋषभ पंत 26 तर अर्शदिप सिंह 25 वर्षांचा आहे. यशस्वी जयस्वाल 22 वर्षांचा आहे. आता हा अनुभवी संघ विश्वविजेता ठरतो की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.