Download App

आज भारत-श्रीलंका दोनदा भिडणार! आधी फायनल नंतर सीरिज सामना; वेळेतही बदल

भारत आणि श्रीलंका यांच्यात आज रविवारी एक नाही तर दोन सामने खेळले जाणार आहेत. एक फायनल सामना आणि एक दुसरा द्विपक्षीय मालिकेचा आहे.

IND vs SL : भारत आणि श्रीलंका यांच्यात आज रविवारी एक नाही तर दोन सामने (IND vs SL) खेळले जाणार आहेत. दोन्ही संघांमध्ये एक फायनल सामना आणि एक दुसरा सामना द्विपक्षीय मालिकेतील आहे. सध्या भारत आणि श्रीलंकेच्या  (India vs Sri Lanka) पुरुष संघात तीन सामन्यांची टी 20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना शनिवारी झाला. दुसरा सामना आज होणार आहे. या व्यतिरिक्त भारत आणि श्रीलंकेचे महिला संघ आशिया कप स्पर्धेतील (Women’s Asia Cup) अंतिम सामना आजच खेळणार आहेत.

महिला आशिया कप फायनल सामन्यात श्रीलंका आणि टीम इंडिया (Team India) आमनेसामने असणार आहेत. हा सामना डांबुलातील रंगिरी डांबुला स्टेडियममध्ये होणार आहे. आज दुपारी तीन वाजल्यापासून सामना सुरू होईल. टीम इंडियाने सेमी फायनलमध्ये बांग्लादेश संघाचा (Bangladesh) पराभव करून फायनलमध्ये एन्ट्री घेतली होती. तर सेमी फायनलच्या अन्य एका सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानचा (SL vs PAK) पराभव करत फायनलमध्ये एन्ट्री पक्की केली होती.

India vs Sri Lanka : सूर्या-गंभीर पर्वाला मॅच विनिंगने सुरुवात ! पहिल्या सामन्यात भारताने लंकेचा धुव्वा उडविला

टी 20 मालिकेतील सामना सायंकाळी

भारत आणि श्रीलंका पुरुष संघांतील टी 20 मालिकेचा दुसरा सामना आज सायंकाळी सात वाजल्यापासून सुरू होणार आहे. हा सामना पल्लेकेले आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. पहिल्या टी 20 सामन्यात भारतीय संघांच्या खेळाडूंनी चमकदार खेळ करत श्रीलंकेवर विजय मिळवला. तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता आजचा सामना जिंकून मालिका विजय साकारण्याच्या उद्देशाने टीम इंडिया मैदानात उतरणार आहे.

महिला संघांच्या सामन्याच्या वेळेत बदल

महिला आशिया कप स्पर्धेत श्रीलंका आणि भारत यांच्यातील अंतिम सामन्याची वेळ बदलण्यात आली आहे. आधी हा सामना सायंकाळी 7 वाजता होणार होता. पण याच वेळेला भारत आणि श्रीलंका पुरुष संघांतील टी 20 सामना होणार आहे. तरी देखील दोन्ही सामने एकाच वेळी खेळवता आले असते. पण क्रिकेट चाहत्यांचा हिरमोड झाला असता. या गोष्टीचा विचार करून महिला संघांच्या सामन्याची वेळ दुपारी 3 वाजता करण्यात आली. दुपारी तीन वाजल्यापासून हा सामना सुरू होईल.

आशिया कप क्रिकेट स्पर्धेत भारतीय महिला खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे. बांग्लादेश संघावर एकतर्फी विजय मिळवत फायनलमध्ये धडक दिली. या सामन्यात भारता समोर श्रीलंकेचं आव्हान असणार आहे. दोन्ही संघांनी जोरदार तयारी केली आहे. श्रीलंकेचा पराभव करून आशिया कप जिंकण्याच्या इराद्याने आज भारताच्या लेकी मैदानात उतरणार आहेत.

Team India : हार्दिक पांड्याला पुन्हा धक्का, ‘हा’ स्टार खेळाडू होणार भारतीय संघाचा कर्णधार

follow us