T20World Cup 2024 : टी 20 विश्वचषक स्पर्धा सुरू होण्यास आता थोडेच (T20 World Cup 2024) दिवस शिल्लक राहिले आहेत. या स्पर्धेत चाहत्यांना पुन्हा एकदा टी 20 क्रिकेटचा थरार अनुभवता येणार आहे. 1 जून रोजी अमेरिका आणि कॅनडा यांच्यातील सामन्याने स्पर्धेला सुरुवात होईल. रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघ यंदा मजबूत दावेदार मानला जात आहे. या स्पर्धेच्या इतिहासावर नजर टाकली तर आतापर्यंत आठ वेळेस ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
सन 2007 मध्ये दक्षिण आफ्रिकेत पहिल्या टी 20 वर्ल्डकप टीम इंडियाने जिंकला. त्यावेळी रोहित शर्मा संघात होता. यानंतर आता 2024 मध्ये जर भारताने विश्वचषक जिंकला तर कप्तान म्हणून रोहित शर्मा याच्यासाठी ही मोठी उपलब्धी असेल. परंतु टी 20 सामना जिंकणे अवघड आहे कारण यामध्ये एक दोन ओव्हरमध्येच सामना फिरतो. त्यामुळे अगदी दुबळा संघ सुद्धा चमत्कार करून दाखवू शकतो.
T20 वर्ल्डकप शेड्यूलमध्ये गडबड; 24 तासांपेक्षा कमी वेळात सेमी फायनल अन् फायनल?
या स्पर्धेत भारतीय संघाचा पाहिला सामना 5 जून रोजी आयर्लंड बरोबर होणार आहे. तर दुसरा सामना 9 जून रोजी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरोधात होणार आहे. टी 20 क्रिकेटमध्ये कधी काय होईल सांगता येत नाही. भारतीय संघाने आतापर्यंत या क्रिकेटमध्ये दमदार खेळ केला आहे पण श्रीलंका आणि न्यूझीलँड या दोन संघांनी भारताला कडवे आव्हान दिले आहे. टी 20 वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात टीम इंडियाला या दोन संघांचा अजूनही पराभव करता आलेला नाही. तर दुसरीकडे बांगलादेश, अफगाणिस्तान, आयर्लंड आणि झिम्बाब्वे या संघांना टी 20 वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाला पराभूत करता आलेले नाही.
टी 20 वर्ल्डकपच्या इतिहासात न्यूझीलंड आणि भारत तीन वेळेस आमनेसामने आले आहेत. या तिन्ही वेळेस भारतीय संघाला पराभव स्वीकारावा लागला आहे. वर्ल्डकपमध्ये श्रीलंका संघाला पराभूत करणे अजून भारतीय खेळाडूंना जमलेले नाही. वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत या दोन्ही संघात दोन सामने झाले आहेत. पहिला सामना 11 मे 2010 मध्ये झाला होता. या सामन्यात श्रीलंकेने पाच विकेट्सने विजय मिळवला होता. यानंतर दुसरा सामना सन 2014 मध्ये बांगलादेशातील मीरपूर येथे खेळवण्यात आला. या सामन्यातही श्रीलंकेने सहा विकेट्सने टीम इंडियाचा दणदणीत पराभव केला होता.
टीम इंडिया टी20 वर्ल्डकपसाठी नव्या जर्सीचं अनावरण, ‘हे’ दोन बदल होणार
टी 20 वर्ल्डकपमध्ये भारतीय संघ पाकिस्तानबरोबर सात वेळा, दक्षिण आफ्रिकेबरोबर सहा वेळा, ऑस्ट्रेलियाबरोबर पाच वेळा, इंग्लंड आणि वेस्टइंडीज बरोबर प्रत्येकी चार वेळेस सामना खेळला आहे. पाकिस्तान विरोधातील सात पैकी पाच सामने भारताने जिंकले आहेत. एका सामन्यात पराभव झाला आहे तर एक सामना टाय राहिला होता. या सामन्यात भारताने बॉल आऊट प्रकारात विजय मिळवला होता.
दक्षिण आफ्रिकेविरोधात सहा सामन्यात भारताने चार सामने जिंकले आहेत तर दोन सामन्यात पराभव झाला आहे. वेस्टइंडिज विरोधात तीन सामने गमावले आहेत तर एका सामन्यात विजय मिळाला आहे. इंग्लंड विरोधातील चार पैकी दोन सामन्यात विजय मिळाला आहे तर दोन सामन्यात मात्र पराभव स्वीकारावा लागला आहे. ऑस्ट्रेलिया विरोधातील पाच सामन्यांपैकी तीन सामने भारताने तर दोन सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले आहेत.