Download App

दक्षिण आफ्रिकेची फायनलमध्ये एन्ट्री! अफगाणिस्तानचा पराभव करत रचला इतिहास

टी 20 विश्वचषकात जिगरबाज खेळ करणाऱ्या अफगाणिस्तानचा सेमी फायनल सामन्यात दणदणीत पराभव करत फायनलमध्ये एन्ट्री घेतली

AFG vs SA : टी 20 विश्वचषकात आतापर्यंत जिगरबाज खेळ (AFG vs SA) करणाऱ्या अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी सेमी फायनल (T20 World Cup) सामन्यात मात्र अत्यंत खराब कामगिरी केली. अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील उपांत्य फेरीतील सामन्यात आफ्रिकेने अफगाणिस्तानवर एकतर्फी विजय मिळवत फायनलमध्ये प्रवेश केला. या सामन्यात अफगाणिस्तानचा संघ फक्त 56 धावांवर ऑल आऊट झाला. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने नवव्या ओव्हरमध्ये सामना जिंकला. या पराभवानंतर अफगाणिस्तानचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे.

अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हाच निर्णय आत्मघाती ठरला. मोठी धावसंख्या उभारण्यात अफगाणी फलंदाज सपशेल अपयशी ठरले. संघाला बारा ओव्हर्सही खेळता आल्या नाहीत. फक्त 56 धावांवर संघ ऑल आऊट झाला. अझमतुल्लानेच सर्वाधिक 10 धावा केल्या. तिघांना तर एकही रन करता आला नाही. दक्षिण आफ्रिकेकडून मार्को जोन्स आणि तबरेझ शम्सी या दोघांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. कागिसो रबाडा आणि एनरि नोर्टजे या दोघांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! पराभवानंतर डेव्हिड वॉर्नरची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

यानंतर फलंदाजीसाठी आफ्रिकेने फक्त 8.5 ओव्हर्समध्येच सामना जिंकून अंतिम सामन्यात प्रवेश केला. क्विंटन डिकॉकने पाच धावा केल्या. रेजा हेंड्रिक्स आणि कॅप्टन एडन मार्करमने या दोघांनीच विजय मिळवून दिला. या दोघांनी 55 धावांची भागीदारी केली. अफगाणिस्तानकडून फजलहक फारुकीने एक विकेट घेतली. अफगाणिस्तानचा हा आतापर्यंतचा सर्वात लाजिरवाणा पराभव ठरला.

या संघाने स्पर्धेत आतापर्यंत अतिशय चांगली कामगिरी केली. न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया अशा बलाढ्य संघांना मात दिली. बांग्लादेशचाही पाडाव केला. गोलंदाजी आणि फलंदाजीतही खेळाडूंनी चांगली कामगिरी केली होती. या कामगिरीच्या जोरावरच अफगाणिस्तान सेमी फायनलपर्यंत पोहोचला होता. येथे आफ्रिकेशी सामना झाला. संघाची आतापर्यंतची कामगिरी पाहता अफगाणी खेळाडू आफ्रिकेलाही जोरदार टक्कर देतील असे वाटत होते. परंतु, येथे अफगाणिस्तान सपशेल अपयशी ठरला. त्यामुळे मोठ्या आणि लाजिरवाण्या पराभवाची नामुष्की सहन करावी लागली.

रोहित शर्मा देणार पांड्याला धक्का, प्लेइंग 11 मध्ये खेळणार ‘हा’ स्टार खेळाडू

दरम्यान, या विजयानंतर दक्षिण आफ्रिका फायनलमध्ये पोहोचला आहे. आफ्रिकेवर चोकर्सचा शिक्का आहे. महत्वाच्या सामन्यात आफ्रिकेचे खेळाडू कच खातात. त्यामुळेच दर्जेदार खेळाडू असतानाही या संघाला आयसीसीचं एकही विजेतेपद अजून मिळवता आलेलं नाही. आता आणखी एक संधी त्यांच्यासमोर चालून आली आहे. फायनलमध्ये भारत किंवा इंग्लंड या दोन्हीपैकी एका संघाविरुद्ध आफ्रिकेला खेळावं लागणार आहे.

follow us

वेब स्टोरीज