Apollo Tyres Team India New Sponsor : टीम इंडियाच्या जर्सीचा नवा स्पॉन्सर कोण असणार, याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा रंगली होती. ड्रीम इलेव्हननंतर सर्वांचे लक्ष या नव्या कराराकडे लागले होते. अखेर या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अपोलो टायर्स टीम इंडियाचा नवा जर्सी स्पॉन्सर होणार आहे. या कराराची किंमत तब्बल 579 कोटी रुपये आहे. मात्र, अद्याप बीसीसीआयकडून या कराराबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. तरीही क्रिकेटप्रेमींमध्ये या डीलमुळे मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
भारतीय क्रिकेट संघाला (Team India) अखेर नवा जर्सी स्पॉन्सर मिळाला आहे. ड्रीम इलेव्हननंतर कोणता ब्रँड टीम इंडियाच्या (Cricket) जर्सीवर झळकणार, याकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं होतं. अखेर गुरुग्रामस्थित अपोलो टायर्स (Apollo Tyres) या कंपनीने मोठी बोली लावत हा करार जिंकला आहे. या कराराची किंमत तब्बल 579 कोटी रुपये इतकी असल्याचे समजते.
क्रिकबझच्या वृत्तानुसार, अपोलो टायर्सचा कार्यकाळ 2027 पर्यंत राहणार असून या काळात टीम इंडिया 121 बायलेटरल सामने आणि 21 आयसीसी सामने खेळणार आहे. या करारानुसार, बीसीसीआयला प्रत्येक सामन्यासाठी 4.5 कोटी रुपये मिळणार आहेत. याआधी ड्रीम इलेव्हनकडून प्रति सामना 4 कोटी रुपये मिळत होते. त्यामुळे हा करार बीसीसीआयसाठी अधिक फायदेशीर ठरणार आहे.
बीसीसीआयने या स्पॉन्सरशिपसाठी बेस प्राईस ठरवली होती. त्यानुसार, बायलेटरल सामन्यांसाठी 3.5 कोटी रुपये आणि आयसीसी वर्ल्ड कप सामन्यांसाठी 1.5 कोटी रुपये अशी किंमत होती. अपोलो टायर्सने त्यापेक्षा जास्त बोली लावत स्पर्धेत आघाडी घेतली. या शर्यतीत कॅनव्हा आणि जेके सिमेंट्स यांचाही समावेश होता. मात्र अपोलो टायर्सने कॅनव्हा पेक्षा तब्बल ३५ कोटींनी जास्त बोली लावली. तर जेके सिमेंट्सने 544 कोटी रुपयेची बोली लावली होती. त्यामुळे अपोलो टायर्सने या स्पर्धेत निर्णायक विजय मिळवला.
सध्या टीम इंडिया आशिया कपमध्ये स्पॉन्सरशिवाय खेळत होती. महिला क्रिकेट संघानेही ऑस्ट्रेलियाविरुद्धची वनडे मालिका कोणत्याही स्पॉन्सरशिवाय खेळली होती. मात्र, अपोलो टायर्ससोबत झालेल्या या मोठ्या करारामुळे आता टीम इंडियाच्या जर्सीवर पुन्हा नवा स्पॉन्सर झळकणार आहे.