Download App

पावसाने केला खेळ! अमेरिकेची सुपर 8 मध्ये धडक; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर

अमेरिका आणि आयर्लंड यांच्यात खेळला जाणारा सामना पावसामुळे रद्द करावा लागला. यामुळे पाकिस्तानचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला.

USA vs IRE : अमेरिका आणि आयर्लंड यांच्यात खेळला जाणारा (USA vs IRE) सामना पावसामुळे रद्द करावा लागला. पाऊस इतका जोरदार होता की नाणेफेक देखील होऊ शकली नाही. सामना सुरू करण्यासाठी (Pakistan Cricket) अनेक प्रयत्न करण्यात आले मात्र पाऊसच इतका जोरदार झाला की शेवटी सामना रद्दच करावा लागला. पावसामुळे सामना रद्द झाल्याचा फायदा अमेरिकेला झाला. भारतानंतर सुपर 8 फेरीत प्रवेश करणारा अमेरिका दुसरा संघ ठरला. टी 20 विश्वचषक स्पर्धेत अमेरिकेने पहिल्यांदाच सहभाग घेतला होता. या स्पर्धेत आतापर्यंत संघाने चांगली कामगिरी केली. तर दुसरीकडे या पावसाचा पाकिस्तानला मोठा फटका बसला. पाकिस्तानचे स्पर्धेतील आव्हानच संपुष्टात आले.

या सामन्यात पावसाचा व्यत्यय येईल असा अंदाज आधीच वर्तवण्यात आला होता. कारण फ्लोरिडात मागील काही दिवसांपासून पाऊस सुरू होता. सामन्यावेळी पाऊस झाला नाही मात्र मैदान ओले होते त्यामुळे नाणेफेकीस उशीर झाला. येथील कर्मचाऱ्यांनी मैदान कोरडे करण्यासाठी भरपूर प्रयत्न केले. या कामात त्यांना बऱ्यापैकी यशही आले होते. परंतु अंपयारने जेव्हा मैदानाची पाहणी केली तेव्हा मैदान ओले असल्याचे जाणवले.

अफगाणिस्तानची हॅट्ट्रीक! PNG वर एकतर्फी विजय अन् न्यूझीलंड वर्ल्डकपमधून बाहेर

यानंतर पुन्हा एक तासाने मैदानाची पाहणी करण्यात आली मात्र सामना सुरू करण्याबाबत कोणताही निर्णय होऊ शकला नाही. तिसऱ्या वेळी पंचांनी पाहणी केली तेव्हा मैदान बऱ्यापैकी कोरडे झाले होते परंतु 30 यार्ड सर्कलजवळ ओलसरपणा होता त्यामुळे आणखी 40 मिनिटे थांबण्याचा निर्णय घेण्यात आला.

चौथ्या वेळेस पंचांबरोबर मॅच रेफरी जवागल श्रीनाथ देखील मैदान पाहण्यासाठी आले होते. याच वेळी ढगांनी पुन्हा गर्दी केली आणि पाऊस पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली त्यामुळे वेळ न दवडता मैदान झाकून टाकण्यात आले. यानंतर काहीच वेळात जोरदार पावसाला सुरुवात झाली आणि चार ते पाच ओवरची मॅच होण्याची शक्यता धुळीस मिळाली. शेवटी सामना रद्द केल्याचे जाहीर करण्यात आले.

ग्रुप ए मध्ये भारतीय संघ तीन सामने जिंकून अव्वल स्थानी आहे. यानंतर अमेरिका पाच अंकांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानचा संघ दोन पराभव, एक विजयासह दोन अंक मिळवून तिसऱ्या क्रमांकावर आहे. आता पुढील सामना जिंकला तरीही पाकिस्तानचे चार अंक होतील. आयर्लंड दोन पराभवासह सर्वात खाली आहे. आयर्लंडचा विश्वचषकातील प्रवास आता थांबला आहे. तर कॅनडाचा संघ एक विजय आणि दोन पराभवासह दोन मिळवून चौथ्या क्रमांकावर आहे.

बाबर आजमसह पूर्ण टीम तुरूंगात जाणार?; भारताने हरवल्यानंतर पाकिस्तानात दाखल झाला देशद्रोहाचा गुन्हा

या स्पर्धेत पाकिस्तानची सुरुवात चांगली राहिली नाही. पहिल्या सामन्यात अमेरिका आणि दुसऱ्या सामन्यात भारताकडून पराभव स्वीकारावा लागला. अमेरिकेने सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानचा पराभव केला होता. तर भारताने सहा धावांनी निसटता विजय मिळवला होता. हे दोन्ही पराभव पाकिस्तानला चांगलेच महागात पडले. यानंतर आजच्या सामन्यावर बरेच काही अवलंबून होते. मात्र पावसामुळे सामना रद्द करावा लागला. यामुळे सुपर 8 फेरीत पोहोचण्याच्या उरल्यासुरल्या शक्यताही मावळल्या.

USA इन, पाकिस्तान आऊट

दरम्यान, हा सामना रद्द झाल्याने दोन्ही संघांना एक एक गुण देण्यात आला. अमेरिकेचे पाच अंक झाले. या वाढलेल्या अंकंसह अमेरिकेने सुपर 8 फेरीत प्रवेश केला. या सामन्यात आयर्लंडने अमेरिकेचा पराभव करावा असे पाकिस्तानला वाटत होते. कारण या सामन्यात जर अमेरिकेचा पराभव झाला असता तर सुपर 8 फेरीत पोहोचण्याची पाकिस्तानची शक्यता कायम राहिली असती. परंतु सामना रद्द झाल्याने पाकिस्तानची वर्ल्डकपमधून सुट्टी झाली आहे. आता पुढील सामन्यात पाकिस्तानने आयर्लंडचा पराभव केला तरी पाकिस्तान सुपर 8 फेरीत प्रवेश करू शकणार नाही.

follow us

वेब स्टोरीज