Virat Kohli’s Instagram account : जगातील सर्वोत्तम आणि लोकप्रिय क्रिकेटपटूंमध्ये गणला जाणारा भारताचा माजी कर्णधार विराट कोहली यांचे इंस्टाग्राम अकाउंट मंगळवारी रात्री उशिरा अचानक निष्क्रिय झाल्याचे दिसून आले. इंस्टाग्रामवर विराट कोहलीचे नाव शोधल्यावर त्याचे अधिकृत प्रोफाईल दिसत नसल्याने चाहत्यांमध्ये एकच खळबळ उडाली. सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असलेल्या विराटचे अकाउंट अचानक गायब झाल्याने त्याचे चाहते आश्चर्यचकित तर झालेच, पण अनेकजण नाराजीही व्यक्त करताना दिसले.
विराट कोहलीने स्वतःहून आपले इंस्टाग्राम अकाउंट डिऍक्टिव्ह केले की इंस्टाग्रामच्या तांत्रिक अडचणीमुळे ही समस्या निर्माण झाली, याबाबत अद्यापपर्यंत विराट कोहली किंवा त्यांच्या व्यवस्थापनाकडून कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. मात्र, अकाउंट दिसत नसल्यामुळे सोशल मीडियावर विविध तर्क-वितर्कांना उधाण आले होते.
दरम्यान, कोहलीचे इंस्टाग्राम अकाउंट डिऍक्टिव्ह झाल्याचे स्क्रीनशॉट काही वेळातच ट्विटर (एक्स), फेसबुक आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाले. “जगातील महान क्रिकेटपटूचे अकाउंट अचानक गायब का झाले?” असा प्रश्न लाखो चाहते सातत्याने विचारत होते. काहींनी हे अकाउंट हॅक झाल्याची शक्यता व्यक्त केली, तर काहींनी विराटने वैयक्तिक कारणांमुळे सोशल मीडियापासून ब्रेक घेतला असावा, असा अंदाज व्यक्त केला.
केंद्रीय आर्थिक पाहणी अहवालानुसार महाराष्ट्रात महसुली तूट; लाडकी बहीण’सारख्या योजनांवर अप्रत्यक्ष ताशेरे
विशेष म्हणजे विराट कोहलीचे इंस्टाग्रामवर तब्बल 274 दशलक्षांहून अधिक (27 कोटी 40 लाखांपेक्षा जास्त) फॉलोअर्स आहेत. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणावर फॉलोअर्स असलेले अकाउंट अचानक गायब होणे, हा विषय केवळ क्रिकेटविश्वातच नव्हे तर सोशल मीडिया विश्वातही चर्चेचा केंद्रबिंदू ठरला होता.
दरम्यान, चाहत्यांसाठी दिलासादायक बाब म्हणजे आज सकाळपासून विराट कोहलीचे इंस्टाग्राम अकाउंट पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसून आले. अकाउंट पुन्हा दिसू लागताच सोशल मीडियावर चाहत्यांनी आनंद व्यक्त केला. अनेक चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत समाधान व्यक्त केले आहे. मात्र, अकाउंट काही तासांसाठी का गायब झाले होते, यामागील नेमके कारण काय होते, याबाबत अद्यापही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे हा प्रकार तांत्रिक अडचण होती की विराट कोहलीने मुद्दाम घेतलेला अल्पकालीन ब्रेक, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
