Matthew Ford : आयर्लंड आणि वेस्ट इंडिज (IREvWI) यांच्यात सुरु असणाऱ्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिडच्या मॅथ्यू फोर्डने (Matthew Ford) इतिहास रचला आहे. या सामन्यात मॅथ्यू फोर्डने एकदिवसीय सामन्यात सर्वांत जलद अर्धशतक ठोकण्याच्या एबी डिव्हिलियर्सच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. 2015 मध्ये, डिव्हिलियर्सने (AB de Villiers) जोहान्सबर्ग येथे वेस्ट इंडिजविरुद्ध 16 चेंडूत अर्धशतक ठोकले होते. तर आता आयर्लंडविरुद्ध सुरु असणाऱ्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात मॅथ्यू फोर्डने या विक्रमाची बरोबरी केली आहे. फोर्डने फक्त 16 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले आणि 19 चेंडूत 58 धावांची शानदार खेळी केली. त्याने या दरम्यान आठ षटकार मारले.
2015 मध्ये डिव्हिलियर्सने वेस्ट इंडिजविरुद्ध 16 चेंडूत अर्धशतक ठोकले होते. त्या सामन्यात त्याने 30 चेंडूत एकदिवसीय इतिहासातील सर्वात जलद शतक ठोकले.
मॅथ्यू फोर्डच्या शानदार खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिज संघाने 8 विकेट्सच्या मोबदल्यात 352 धावा केल्या. शेवटच्या 5 षटकांत वेस्ट इंडिजने 91 धावा केल्या. या सामन्यात आयर्लंडने नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजला प्रथम फलंदाजी करण्यास सांगितले होते. मात्र प्रथम फलंदाची करताना वेस्ट इंडिजला सुरुवातीलाच दोन मोठे धक्के बसले. ब्रँडन किंग आणि एविन लुईस हे दोन्ही सलामीवीर 46 धावांवर बाद झाले. पण यानंतर केसी कार्टीने शानदार खेळी करत वेस्ट इंडिजला पुन्हा या सामन्यात आणले. केसी कार्टीला कर्णधार साई होपने साथ दिली. होप 49 धावांवर बाद झाला पण कार्टीने शतक झळकावले. त्याने 109 चेंडूत 102 धावा केल्या. तर जस्टिन ग्रीव्हजने 36 चेंडूत नाबाद 44 धावा केल्या. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आयर्लंडने जिंकला होता.
Matthew Forde has equalled AB de Villiers’ record for the fastest ODI fifty 🚀🚀 #IREvWI pic.twitter.com/w5Ie19KXxJ
— Cricbuzz (@cricbuzz) May 23, 2025
एकदिवसीय सामन्यातील सर्वात जलद अर्धशतक
एबी डिव्हिलियर्स : 16चेंडू विरुद्ध वेस्ट इंडिज
मॅथ्यू फोर्ड : 16 चेंडू विरुद्ध आयर्लंड
सनथ जयसूर्या : 17 चेंडू विरुद्ध पाकिस्तान
कुसल परेरा : 17 चेंडूत विरुद्ध पाकिस्तान
मार्टिन गुप्टिल : 17 चेंडू विरुद्ध श्रीलंका
लियाम लिव्हिंगस्टोन : 17 चेंडू विरुद्ध नेदरलँड्स