Download App

Maharashtra Assembly : भास्कर जाधवांनी राऊतांसाठी एकाकी खिंड लढवली…

  • Written By: Last Updated:

प्रफुल्ल साळुंखे : टीम लेटस्अप

मुंबई : खासदार संजय राऊत यांनी आज कोल्हापूरातून वादाची नवीन बत्ती पेटवली. ही बत्ती इतकी पेटली की विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांत त्याची झळ बसली. राऊत यांच्याविरोधात हक्कभंग आणण्यासाठी सत्ताधारी शिवसेना आणि भाजप यांनी जोरदार प्रयत्न केले. या प्रयत्नाला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही साथ दिली. विधीमंडळाचा कोणी अपमान करत असेल तर त्याला सूट देऊ नका. तो कोणत्याही पक्षाचा असू दे. त्याला शिक्षा झाली पाहिजे, अशी भूमिका अजित पवार यांनी घेतल्याने उद्धव ठाकरे गटाच्या उरल्यासुरल्या आमदारांचे चेहरे पाहण्यासारखे झाले होते. मात्र आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीसाठी प्रसिद्ध असलेल्या आमदार भास्कर जाधव यांनी राऊत यांची बाजू लावून धरली आणि ठाकरे गटाकडून बचावाचा किल्ला लढवला. त्यामुळे जाधव विरुद्ध इतर सर्व आमदार असेच चित्र निर्माण झाले होते. विधीमंडळाच्या एक मार्च या दिवसाचा चर्चेतील चेहरा हे भास्कर जाधव हेच ठरले.

Nitesh Rane: …तर संजय राऊत उद्या दिसणार नाही

खरे तर जाधव यांनी रविवारीच सत्ताधाऱ्यांवर तोफ  डागली होती. ठाणे आणि वरळी येथील सभांत त्यांनी नारायण राणे, रामदास कदम यांची यथेच्छ टिंगल केली होती. विधीमंडळाच्या कामकाजाच्या पहिल्या दिवशीच त्यांची आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चकमक उडाली होती. त्यानंतर लगेच मोहीत कंबोज हे जाधव यांच्याविरोधात सोशल मिडियातून टीका करू लागले. जाधव हे शिंदे गटात येण्यासाठी शंभर वेळा फोन करत होते, असा दावा कंबोज यांनी केल्याने जाधव यांनी अक्षरक्षः त्यांचा बाप काढला. मग कंबोज यांनीही त्यांची आई काढली. त्यामुळे गेले चार दिवस भास्कर जाधव हेच चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले.

आजच्या संकटातही त्यांनी चांगले मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करत राऊत यांची बाजू मांडण्यासाठी शिकस्त लढवली. विरोधी पक्षांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी बोलविलेल्या चहापानावर बहिष्कार टाकला होता. त्याला अनुसरून मुख्यमंत्र्यांनी राज्याचा विरोधी पक्ष हा देशद्रोही असल्याचा आरोप केला होता. हा मुद्दा जाधव यांनी राऊत यांच्या समर्थनार्थ उपस्थित करत समस्त विरोधी पक्षाला देशद्रोही म्हटल्याबद्दल कोणी आवाज उठवला का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सभागृहाबाहेरील सदस्यावर (राऊत यांच्यावर) कारवाई करण्यासाठी सत्ताधारी पक्ष इतका कांगावा करणार असेल तर सभागृहातील सर्वोच्च नेता विरोधी पक्षाला देशद्रोही म्हणाला तेव्हा ते गप्प का होते, अशी भूमिका जाधव यांनी मांडली. जाधव यांच्या या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीच्या इतर नेत्यांनीही मग त्याचीच री ओढली. राऊत यांच्या विरोधात कसा हक्कभंग होत नाही, याचीही मांडणी जाधव यांनी केला. त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या हल्ल्यात जाधव यांनी एकाकी किल्ला लढविला. परिणामी तेच आज चर्चेतील चेहरा ठरले.

letsupp चे अनुसरण करा

भास्कर जाधव यांच्याकडून संजय राऊत यांचा बचाव

Tags

follow us