Download App

सरकारी भाषा अन् आश्वासनांचा पाऊस : महाजनांसोबतचा संवाद जरांगे पाटलांनी महाराष्ट्राला ऐकवला

जालना : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आजपासून (25 ऑक्टोबर) पुन्हा एकदा आमरण उपोषणाची घोषणा केली आहे. आता आरक्षण मिळेपर्यंत ना अन्, ना पाणी ना वैद्यकीय उपचार घेणार अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे या पुढील काळात मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा चिघळण्याची शक्यता आहे. दरम्यान, जरांगे पाटील यांनी उपोषणाची घोषणा करु नये यासाठी राज्य सरकार तर्फे मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी अखेरच्या क्षणापर्यंत शिष्टाई करण्याचा प्रयत्न केला. मात्र जरांगे पाटील त्यांच्या निर्णयावर ठाम राहिले. (Communication between Minister Girish Mahajan and Manoj Jarange Patil to prevent from declaring a hunger strike)

गिरीश महाजनांचा जरांगे पाटलांना फोन :

सकाळी अकरा वाजता जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. मात्र यापूर्वीच मंत्री गिरीश महाजन यांनी सरकारतर्फे बोलणी करण्यासाठी जरांगे पाटील यांना फोन केला आणि उपोषणाची घोषणा न करण्याची विनंती केली. यावेळी जरांगे पाटील यांनी महाजन यांच्यासोबतचा संवाद कॅमेरासमोरच महाराष्ट्राला ऐकवला.

जरांगे पाटलांकडून पुन्हा उपोषणाचा एल्गार! गिरीश महाजनांची अखरेच्या क्षणापर्यंतची शिष्टाई निष्फळ

यावेळी बोलताना महाजन जरांगे पाटील यांना म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे ही सरकारची प्रामाणिक भावना आहे. मागील वेळी आम्हीच आरक्षण दिलं होतं. उच्च न्यायालयाने ते स्विकारले पण सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावले. यावेळी आपल्याला टिकणारे आरक्षण द्यायचे आहे. त्यामुळे थोडा वेळ लागत आहे. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, तुम्ही टोकाचा निर्णय घेऊ नका, अशी विनंतीही त्यांनी जरांगे पाटील यांना केली.

पण जरांगे पाटील यांनी सरकारच्या मागील 40 दिवसांच्या कामकाजावर बोट ठेवत महाजन यांना प्रत्युत्तर दिले. “तुम्ही एक महिना मागितला. आम्ही तुम्हाला 40 दिवस दिले. अजूनही आरक्षण दिलं नाही. दोन दिवसात गुन्हे मागे घेतो म्हटले होते. तेही तुमच्याकडून झालं नाही. तुम्ही आरक्षण काय देणार? आंदोलन सुरू आहे म्हणून आमच्यावरचा डाव तसा ठेवला आहे का? 16 जणांनी आत्महत्या केल्या. त्यांच्याबद्दल सरकारने साधी सहानुभूती दाखवली नाही. नुकसान भरपाई देतो म्हणाले होते, ती दिली नाही, असाही दावा जरांगे पाटील यांनी केला.

देवेंद्र फडणवीसांच्या मध्यस्थीला यश! निलेश राणेंची नाराजी दूर; निवृत्तीचा निर्णय 24 तासात मागे

जरांगे पाटील यांच्या या सगळ्या दाव्यांवर गिरीश महाजन यांनी बघू, करु आपण ते, ते अंतिम टप्प्यात आहे. मदतीचे आश्वासन दिले आहे. तुम्ही टोकाचा निर्णय घेऊ नका, मी मुख्यमंत्री महोदयांशी तुमची चर्चा करतो, असं म्हणतं वारंवार जरांगे पाटील यांना उपोषणाचा निर्णय न घेण्याचे आवाहन करत होते. मात्र तुम्हाला काय करायचे होते ते करा, पण मराठ्यांना आरक्षण द्या, अशी भूमिका घेत जरांगे पाटील यांनी उपोषणाचा निर्णय जाहीर केला.

Tags

follow us