Rajesh Tope met Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी इरेला पेटलेले मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटी येथील उपोषणाचा आजचा नववा दिवस आहे. तत्पूर्वी मंगळवारी मध्यरात्री शरद पवार गटाचे आमदार राजेश टोपे हे अचानक अंतरवाली सराटी येथे आले होते. ते काहीवेळ स्टेजवर मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांच्यापाशी जाऊन बसले होते. या दोघांमध्ये काही चर्चा झाली किंवा नाही, याबाबत नेमकी माहिती नाही. मात्र, राजेश टोपे हे काहीवेळ मनोज जरांगे यांच्या उशापाशी बसून होते. त्यानंतर राजेश टोपे यांनी जरांगेंच्या काही सहकाऱ्यांशी चर्चा केली.
प्रकृती खालावली
मंगळवारी रात्री 12 च्या सुमारास राजेश टोपे यांनी आंदोलनस्थळी जाऊन मनोज जरांगे यांच्या तब्येतीची त्यांच्या सहकाऱ्यांची चौकशी केली होती. त्यांनी मनोज जरांगे यांना उपचार घेण्याची विनंती केली. राजेश टोपे गेल्यानंतर मनोज जरांगे यांची प्रकृती फारच खालावत असल्याने आंदोलकांनी सहकाऱ्यांच्या विनंतीवरून मनोज जरांगे यांनी मध्यरात्री वैद्यकीय उपचार घेतल्याचं समजतं.
उद्धव ठाकरे अन् शरद पवारांकडून ते लिहून घ्या; देवेंद्र फडणवीसांचा थेट मनोज जरांगे पाटलांवर घाव
मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा नववा दिवस आहे. गेल्या काही दिवसांत त्यांची प्रकृती प्रचंड खालावली आहे. मनोज जरांगे यांचा रक्तदाब सातत्याने वरखाली होत आहे. अशक्तपणामुळे त्यांना चालणे आणि एका जागेवर बसणेही मुश्कील झाले आहे. शरीरातील पाण्याची पातळी प्रचंड खालावल्याने मनोज जरांगे यांना चक्करही येत आहे. मात्र, तरीही मनोज जरांगे पाटील हे वैद्यकीय उपचार घ्यायला तयार नाहीत. काही दिवसांपूर्वीच संभाजीराजे छत्रपती यांनी उपोषणस्थळी भेट देऊन मनोज जरांगे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती वेगाने खालावत आहे. त्यामुळे आता राज्य सरकार काय पावले उचलणार, हे पाहावे लागेल.
जिल्हाधिकाऱ्यांची विनंती
मनोज जरांगे यांनी मंगळवारी मध्यरात्री गावकरी आणि सहकाऱ्यांच्या आग्रहाने वैद्यकी उपचार घेतले. रात्री एकच्या सुमारास त्यांना सलाईन लावण्यात आले. जिल्हाधिकारी श्रीकृष्ण नाथ पांचाळ आणि पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी जरांगे यांना त्यांना उपचाराला सहकार्य करत उपोषण मागे घेण्याची विनंती देखील केली.