Download App

आमदार साहेब असं वागणं बरं नव्हे! संजय गायकवाड: शिवीगाळ, मारहाण, महापुरुषांचा अपमान आणि बरंच काही…

Shiv Sena MLA Sanjay Gaikwad Thrashes Canteen Worker:  बुलढाण्यापासून थेट मुंबईपर्यंत, जिथे जिथे संजय गायकवाड तिथे तिथे नवा वाद, असं काहीसं समीकरण गेल्या काही वर्षांपासून तयार झालंय. एक आमदार म्हणून ते कायम प्रसिद्धीच्या झोतात असतात, पण त्या प्रसिद्धीमागे असते ते त्यांचं वादग्रस्त वक्तव्यं, आक्रमक भूमिका आणि कधी कधी तर थेट मारहाण.
सध्या सर्वात जास्त चर्चेत असलेलं प्रकरण म्हणजे मुंबईतील आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये घडलेली घटना. आमदारसाहेब जेवण मागवतात, पण ते म्हणे खूपच खराब असतं. मग काय? बनीयन आणि टॉवेलवरच ते थेट कॅन्टीनमध्ये पोहोचतात. जाऊन कर्मचाऱ्यावर ओरडणं, शिवीगाळ करणं आणि चक्क त्याच्या श्रीमुखात भडकवणं! या घटनेचा व्हिडिओ वाऱ्यासारखा पसरला आणि टीका व्हायला लागली. पण विशेष म्हणजे, गायकवाड साहेबांना याची कोणतीही खंत नाही. उलट, “जेव्हा लोकशाहीची भाषा लोकांना समजत नाही, तेव्हा अशीच भाषा वापरावी लागते,” असं त्यांनी छातीठोकपणे सांगितलं. हा त्यांचा अहंकार आहे की दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न, हा प्रश्न यानिमित्ताने उभा राहतो.
त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांची यादी खूप मोठी आहे. काँग्रेस नेते राहुल गांधींबद्दल त्यांनी केलेलं एक वक्तव्य तर देशपातळीवर गाजलं होतं. “जो राहुल गांधीची जीभ कापून आणेल, त्याला मी ११ लाखांचं बक्षीस देईन,” असं ते जाहीरपणे बोलले होते. या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. अनेक पोलीस तक्रारीही झाल्या. पण गायकवाड आपल्या भूमिकेवर ठाम राहिले.
२०२४ मध्ये शिवजयंतीच्या वेळीही ते चर्चेत आले. एका व्हिडिओमध्ये ते पोलिसांची लाठी हिसकावत काही तरुणांना मारहाण करताना दिसले. अर्थात, त्यांनी याचंही समर्थन करत, “ते तरुण महिलांना त्रास देत होते, त्या तरुणांकडे चाकू होता आणि वाद घालण्याच्या तयारीत होते, त्यामुळे मी हस्तक्षेप केला,” असं सांगितलं. पण एका आमदाराने थेट कायदा हातात घेऊन पोलिसांच्या उपस्थितीत लोकांना मारहाण करणं कितपत योग्य आहे?
धक्कादायक बाब म्हणजे, एक पोलीस कर्मचारी गायकवाड यांच्या गाडीची धुलाई करत असल्याचा व्हिडिओ मध्यंतरी व्हायरल झाला होता. त्यांच्यावर सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप झाला. पण गायकवाड साहेबांनी यावरही स्पष्टीकरण दिलं, “माझ्या गाडीत उलटी केली होती, म्हणून त्या पोलिसाने स्वतःहून मदत केली.” हे स्पष्टीकरण कितपत खरं आहे, हे तुम्हीच ठरवा.
जानेवारी 2025 मध्ये बुलढाण्यातील एका सभेत गायकवाड यांनी मतदारांविषयी आक्षेपार्ह शब्द वापरत, “मतदारांना फक्त दारू आणि मटण हवे,” असं विधान केलं होतं.
एप्रिल 2025 मध्ये तर,  संजय गायकवाड यांनी महाराष्ट्र पोलिसांना “जगातील सर्वात अकार्यक्षम” संबोधलं होतं. या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी याची दखल घेत गायकवाड यांना समज दिली होती.
जुलै 2025: भाषा आणि मराठा समाजाच्या संदर्भात बोलताना, गायकवाड यांनी छत्रपती संभाजी महाराज आणि इतर मराठा नेत्यांचा उल्लेख करत “ते मूर्ख होते का?” असं वक्तव्य केलं. या विधानामुळे मराठी जनतेनं तीव्र संताप व्यक्त केला होता.
काही वर्षांपूर्वी, त्यांनी १९८७ मध्ये आपण वाघाची शिकार केल्याचा आणि तेव्हापासून त्याचा दात गळ्यात घालतो असं विधान केलं होतं. यावरून वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी झाली. हे फक्त एक विधान होतं की खरंच असं काही घडलं होतं, हे अजूनही गुलदस्त्यात आहे. पण यातून त्यांची वाचाळवृत्ती दिसून येते.
२०२० मध्ये कोरोना लॉकडाऊन दरम्यान वाढीव वीज बिलांविरोधात त्यांनी थेट वीज कार्यालयात जाऊन बिलं जाळली होती. पक्षफुटीनंतर ते एकनाथ शिंदेंसोबत गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह भाषा वापरली होती. २०१९ मध्ये एका शिक्षकाला फोनवरून धमकी देणं असो, किंवा २०२३ मध्ये आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना धमकावणं असो, संजय गायकवाड हे सतत वादांच्या केंद्रस्थानी राहिले आहेत.
संजय गायकवाड यांची राजकीय कारकीर्द ही त्यांच्या वादग्रस्त आणि आक्रमक स्वभावाभोवतीच फिरते. त्यांची वक्तव्यं, त्यांची कृती यातून ते नेहमीच ‘आपण कुणालाही घाबरत नाही’ हे दाखवण्याचा प्रयत्न करतात. मात्र, एका लोकप्रतिनिधीनं समाजासमोर कोणता आदर्श ठेवला पाहिजे, हा प्रश्न त्यांच्या प्रत्येक कृतीतून उभा राहतो. त्यांच्या या वर्तनावर विरोधकांनी आणि जनतेने तीव्र टीका केली आहे, मात्र गायकवाड आपल्या भूमिकेवर कायम ठाम राहिले आहेत.
follow us