Download App

NCP ने कोश्यारींना जाता-जाताही सोडलं नाही, व्हायरल केली उपहासात्मक ‘मार्कशीट’

  • Written By: Last Updated:

मुंबई : महाराष्ट्राचे मावळते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांचा राजीनामा काही दिवसांपूर्वी मंजूर करण्यात आला आहे. मागच्या कित्येक महिन्यांपासून महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे महापुरुषांबाबत अवमानकराक वक्तव्य केल्याप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. वारंवार त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे ते विरोधी पक्षांच्या निशाण्यावर आले होते. विरोधी पक्षांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र, भाजपने राज्यपालांवर कारवाई केली नाहीच. आता राज्यपालांनी स्वेच्छेने दिलेला राजीनामा मंजूर झाला आहे. शनिवारी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais) शपथ घेतील. मात्र कोश्यारी यांना जाता जाता राष्ट्रवादी काँग्रेसने (Nationalist Congress० चांगलाच टोला मारलाय.

भगतसिंह कोश्यारी यांची एक उपहासात्मक मार्कशीट तयार करण्यात आली आहे. व्हॉट्सअप विद्यालयाची ही मार्कशीट असल्याचं त्यात दाखवण्यात आलंय. राष्ट्रवादी काँग्रेसने ही मार्कशीट ट्विट केली आहे. मात्र, या मार्कशीटला प्रगती पुस्तक न म्हणता अधोगती पुस्तक म्हटलं आहे. त्यात राज्यपालांचे मार्क, त्यांचा नंबर, तसेच त्यांची तुकडी अशी शैक्षणिक माहिती देण्यात आली आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची तुकडी ढ असल्याचं मार्कशीटवर नमूद करण्यात आलंय. तर हजेरी क्रमांक ४२* असा दाखवण्यात आला. राष्ट्रवादीने ट्विट केलेल्या या मार्कशीटमध्ये राज्यपाल कोश्यारी यांना इतिहास विषयात भोपळा, भूगोलात ३५, नागरिक शास्त्रात १७ , सामान्य ज्ञानात ३४ तर कला विषयात त्यांना १०० पैकी शंभर मार्क देण्यात आले आहेत. तर राज्यपालांनी महाराष्ट्रातील महापुरुषांविषयी केलेल्या अवमानकारक वक्तव्यावरून त्यांना इतिहासात भोपळा (००) देण्यात आला.

“… अविश्वास असेल तर मी नियुक्त केलेले अध्यक्ष योग्य कसे?” उपाध्यक्ष Narhari Zirwal स्पष्टच बोलले

व्हॉट्सअपवर व्हायरल करण्यात आलेल्या या मार्कशीटमध्ये शेराही देण्यात आलाय. सदर विद्यार्थ्याची बौद्धिक क्षमता पाहता पालकांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे. या विद्यार्थ्याची वर्तणूक पाहता, याची सुरुवात बालवाडीपासूनच सुरु करणे योग्य राहील, अशा शब्दात चिमटा काढण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आलेल्या संदेशात एक पत्रही आहे. सदर शाळेच्या मुख्याध्यापकांनी लिहिलेल्या या पत्रात राज्यपालांना मार्मिकपणे टोले लगावण्यात आले. या पत्रात लिहिलं आहे की –

आमच्या शाळेतील भगतसिंह कोश्यारी नामक विद्यार्थ्याला तत्काळ शाळेतून कमी करण्यात आले आहे. सदरहू विद्यार्थ्याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्यामुळे तसेच विद्यार्थ्याने सुधारणेचे कोणतेही चिन्ह न दाखवल्याने अखेर त्यांची गच्छंती करण्यात येत आहे. सदरहू विद्यार्थ्याची बौद्धिक क्षमता अगदीच तोकडी असून मनोरंजनपर विषयात गती असली तरी बाकी विषयांचा अभ्यास कच्चा आहे. आपली जबाबदारी ओळखण्याऐवजी इतर विद्यार्थ्यांविषयी चुकीची माहिती पसरवण्याचे काम विद्यार्थ्याने केले आहे. तसेच खोडसाळफणा, नियमांचे उल्लंघन, शाळेतील शांततेचा भंग करणे आणि वाद निर्माण करणे अशी कृत्ये विद्यार्थी सातत्याने करत असतो. या वृत्तीमुळे तुमच्या शाळेतील इतर विद्यार्थ्यांवरही संगतीचा वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सदर विद्यार्थ्यांस शाळेत प्रवेश देण्याचा विचार करत असल्यास वरील सर्व बाबींची गंभीर नोदं घ्यावी, ही विनंती.

Tags

follow us