Bhau Kadam : राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. प्रत्येक पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी जोरदार प्रचार करत आहे. अनेक राजकीय पक्ष सिनेइंडस्ट्रीतील सेलिब्रिटींना देखील प्रचारासाठी मैदानात उतरवत आहे. यातच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मोठा निर्णय घेत विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये अभिनेता भाऊ कदम (Bhau Kadam) यांचे नाव जोडले आहे. त्यामुळे आता अभिनेता भाऊ कदम देखील राष्ट्रवादी काँग्रेससाठी (NCP) प्रचार करताना दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेते सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांनी देखील अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता तर बिग बॉस 5 मराठी विजेता सूरज चव्हाण (Suraj Chavan) देखील अजित पवार यांच्यासाठी विधानसभा निवडणुकीत प्रचार करत आहे.
नुकतंच अजित पवार यांनी अभिनेता भाऊ कदम यांची भेट घेतली आहे. याबाबत त्यांनी X वर माहिती देखील दिली आहे. माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस काही मतदारसंघात अभिनेते भाऊ कदम यांच्या रॅलीचं आयोजन करणार आहे आणि या रॅलीमध्ये भाऊ कदम लाडकी बहीण योजना आणि सरकारच्या इतर योजनेची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणार आहे.
आज प्रसिद्ध मराठी अभिनेते श्री. भाऊ कदम यांनी माझी सदिच्छा भेट घेतली. यावेळी खा. श्री. सुनील तटकरे, श्री. सिध्दार्थ कांबळे आणि त्यांचे इतर सहकारी उपस्थित होते. pic.twitter.com/EwtruWtldd
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) November 5, 2024
माध्यमांशी बोलताना भाऊ कदम म्हणाले की, अजित पवार यांनी कलाकारांसाठी खूप काही केलं आहे. अनुदान दिले आहे. तसेच त्यांनी जी लाडकी बहीण योजना आणली आहे ती खूप उपयुक्त योजना आणली आहे. त्यामुळे मला त्यांचा स्टार प्रचारक व्हायला नक्की आवडेल. अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना अभिनेता भाऊ कदम यांनी दिली.
विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार यांनी 27 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह खासदार सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे- पाटील, सयाजी शिंदे, धनंजय मुंडे (Dhananjay Munde) , हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, रुपाली चाकणकर यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे.