Download App

अजित पवार गटाची तिसरी यादी जाहीर; लंकेंच्या पारनेरात काशिनाथ दातेंना तिकीट

महायुतीतील अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तिसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत चार उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली.

विशेष प्रतिनिधी (प्रशांत गोडसे)

Ajit Pawar NCP Candidate’s Third List : राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून उमेदवारी याद्या जाहीर होत आहेत. आज महायुतीतील अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तिसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत चार उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली आहे. नगर जिल्ह्यतील पारनेर विधानसभा मतदारसंघातून माजी जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ दाते यांना तिकीट मिळालं आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाड मतदारसंघात दिलीपकाका बनकर यांना संधी मिळाली आहे.

राज्यात चर्चेत असलेल्या पारनेर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने खासदार निलेेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांना उमेदवारी दिली आहे. महायुतीत हा मतदारसंघ अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळाला होता. त्यामुळे या मतदारसंघातून कुणाला तिकीट मिळणार असा प्रश्न होता. तिकीट मिळेल या अपेक्षेने काही दिवसांपुर्वीच पारनेरचे माजी नगराध्यक्ष विजय औटी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे, माजी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे यांनी अजित पवार गटात प्रवेश केला होता.

शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; बारामतीतून युगेंद्र पवार तर, वळसेंच्या विरोधात निकम

त्यामुळे या नेत्यांपैकीच एकाला संधी मिळेल अशी चर्चा होती. काही दिवसांपूर्वी विजय औटी यांनी पारनेरात जाहीर सभेचे आयोजन केले होते. या सभेला अजित पवार स्वतः उपस्थित होते. या सभेत अजितदादांनी निलेश लंकेंवर सडकून टीका केली होती. मात्र या मतदारसंघात कुणाला तिकीट देणार याचे संकेत या सभेत मिळाले नव्हते. त्यानंतर मात्र आज पक्षाने पारनेर मतदारसंघात आपला उमेदवार जाहीर केला आहे. अजित पवार गटाने अनुभवी नेते काशिनाथ दाते यांना उमेदवारी जाहीर केली आहे. दातेंच्या उमेदवारीनंतर या मतदारसंघात आता तुल्यबळ लढत होईल अशी चिन्हे आहेत.

गेवराईत काका विरुद्ध पुतण्या लढणार

याव्यतिरिक्त अजित पवार गटाच्या या तिसऱ्या यादीत आणखी तीन जणांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील गेवराई मतदारसंघात विजयसिंह पंडीत यांना तिकीट मिळालं आहे. या मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार यांनी काही दिवसांपूर्वीच राजीनामा दिला होता. आता ते अपक्ष म्हणून निवडणुकीत आहेत. त्यांच्या राजीनाम्यानंतर महायुतीच्या जागावाटपात हा मतदारसंघ अजित पवार गटाला तर आष्टी मतदारसंघ भाजपला मिळाला होता. या मतदारसंघात विजयसिंह पंडीत अपक्ष निवडणुकीची तयारी करत होते. मात्र त्यांना आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून तिकीट जाहीर झालं आहे. त्यामुळे या मतदारसंघात काका बदामराव पंडीत विरुद्ध पुतण्या विजयसिंह पंडीत अशी लढत होणार आहे.

फलटणमध्ये चव्हाण वि. पाटील लढत

फलटण मतदारसंघात मोठा राजकीय ट्विस्ट घडला होता. अजित पवार यांनी उमेदवारी जाहीर केल्यानंतरही विद्यमान आमदार दीपक चव्हाण यांनी शरद पवार गटात प्रवेश केला होता. त्यांची ही बंडखोरी अजितदादांसाठी धक्कादायक होती. त्यामुळे अजित पवार या मतदारसंघात कुणाला संधी देणार याची चर्चा होती. अखेर आज पक्षाने या मतदारसंघातील सस्पेन्स संपवला आहे. फलटणमधून सचिन सुधाकर पाटील यांनी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आता या मतदारसंघात शरद पवार गटाने आमदार दीपक चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे. तेव्हा या मतदारसंघात आता अजित पवार गटाचे सचिन पाटील आणि दीपक चव्हाण यांच्यात लढत होणार आहे.

घनसावंगीवरून महायुतीत पेच कायम; अजित पवार गटाचा दावा, शिंदेंसेनेत प्रवेश केलेल्या उढाणेंची गोची होणार?

follow us