Download App

विदर्भावरून ‘मविआ’त धुसफूस! भाजप-काँग्रेसच्या थेट लढतीत नव्या कार्डची चर्चा

विदर्भातील काही जागा मिळाव्यात अशी मागणी ठाकरे गटाने केली आहे. मात्र काँग्रेस जागा सोडण्याच्या मूडमध्ये नाही.

Maharashtra Elections 2024 : राज्यातील सध्याच्या राजकीय चित्रात महाविकास आघाडी (MVA) आणि महायुतीत लढत होईल असंच दिसत आहे. जागावाटप अंतिम टप्प्यात आहे. उमेदवारांची घोषणा कधीही होईल असे सांगितले जात आहे. संभाव्य याद्याही बाहेर पडू लागल्या आहेत. यातच दोन्ही आघाड्यांत खटके उडताना दिसत आहेत. महाविकास आघाडीत (Maharashtra Elections 2024) विदर्भ आणि मुंबईतील काही जागांवरून धुसफूस होत आहे. विदर्भातील काही जागा मिळाव्यात अशी मागणी ठाकरे गटाने केली आहे. मात्र काँग्रेस ठाकरे गटाला जागा सोडण्याच्या मूडमध्ये नाही. दोन्ही आघाड्यांसाठी विदर्भ इतका का महत्वाचा आहे हे जाणून घेऊ या..

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. यानंतर राजकीय पक्षांच्या हालचाली वाढल्या आहेत. लवकरच उमेदवारांच्या याद्या जाहीर होतील. कोणता मतदारसंघ कुणाला मिळाला याचं उत्तरही तेव्हाच मिळेल. राज्यातील प्रत्येक मतदारसंघावर राजकीय पक्षाच्या नेत्यांचं बारकाईने लक्ष आहे. विदर्भावर सर्व राजकीय पक्षांची नजर आहे. विदर्भात एकूण 62 विधानसभा मतदारसंघ येतात. म्हणजे या भागात ज्या पक्षाचा नंबर गेम चांगला असेल त्याच्या विजयाचा मार्ग आणखी सोपा होईल यात शंका नाही.

काँग्रेस (Congress Party) आणि भाजप या दोन्ही पक्षांची नजर विदर्भावर आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणच्या तुलनेत विदर्भात मित्र पक्ष आणि लहान पक्षांची मोठी भूमिका दिसत नाही. त्यामुळे येथे भाजप आणि काँग्रेस यांच्यातच सरळ लढत होत असते. महाविकास आघाडीची गुरुवारी बैठक पार पडली. या बैठकीत मुंबई आणि विदर्भातील २८ जागांवर एकमत होऊ शकलं नाही.

मविआतील चर्चेच्या गुऱ्हाळात ठाकरेंचा धमाका; विधानसभेसाठी 32 शिलेदार ठरले, वाचा सविस्तर

भाजपसाठी विदर्भ का महत्त्वाचा

आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप विदर्भातील ६२ पैकी ५० जागांवर निवडणूक लढू शकतो. उर्वरित १२ जागा एकनाथ शिंदे शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जाऊ शकतात. दुसरीकडे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार येथील ४५ जागांवर जोर देत आहेत. उर्वरित जागा ठाकरे आणि शरद पवार गटाला सोडल्या जातील असे सांगितले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी २० सप्टेंबर आणि ५ ऑक्टोबर अशा दोन वेळा विदर्भाचा दौरा केला आहे. यावरून अंदाज येतो की यंदा भाजपला विदर्भ अत्यंत महत्त्वाचा आहे.

विदर्भातील नागपूर शहरात (Nagpur) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आहे. त्यामुळे या भागात भाजप स्वतः ला जास्त मजबूत मानत आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघाचे नेतृत्व करतात. मागील निवडणुकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना तिकीट मिळालं नव्हतं. परंतु यंदा त्यांना उमेदवारी मिळेल याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

बल्लारपूर मतदारसंघाचे आमदार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यंदा कोणतीही कसर ठेवण्याच्या इराद्यात नाही. या व्यतिरिक्त नागपूर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे नितीन गडकरी (Nitin Gadkari) याच भागात भाजपचे स्टार कँपेनर म्हणून प्रचार करताना दिसतील.

Assembly Elections 2024 : विदर्भातील जागा जिंकण्याचा प्लॅन ठरला? अमित शाहांनी फडणवीस, बावनकुळेंना दिले टार्गेट 

काँग्रेसची काय आहे तयारी

केंद्रीय नेतृत्वाबरोबर झालेल्या बैठकीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विदर्भावर जास्त भर दिला आहे. कधीकाळी विदर्भ हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. परंतु, मागील दोन दशकांपासून भाजपने येथे पकड घट्ट केली आहे. २०१४ आणि 2019 मधील निवडणुकांत वेगळ्या विदर्भ राज्याचा मुद्दा फारसा चालला नाही. राजकीय पक्षांनीही या मुद्द्याला हवा दिली नाही. भाजपाने विकासाच्या मुद्द्यावर या भागाचे मागासलेपण दूर करण्याचा प्रयत्न करत आहे.

विदर्भात तेली आणि कुणबी समाज प्रामु्ख्याने आहेत. हे दोन्ही समाज ओबीसीत येतात. निवडणुकीतही या समाजांची भूमिका निर्णायक असते. काँग्रेसच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी वेगळ्या रणनितीवर काम करत आहे. भाजपही येथील सामाजिक समीकरणांनुसार रणनिती आखत आहे. आता कुणाची रणनीती यशस्वी ठरणार याचं उत्तर निवडणुकीनंतरच मिळणार आहे.

follow us