Devendra Fadnavis Speech : राज्यात लोकसभा निवडणुकीत भाजपला (BJP) मोठा फटका बसला. महायुतीला केवळ 18 जागा मिळाल्या आहेत. या पराभवाची जबाबदारी घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) आपल्याला मंत्रिमंडळातून मुक्त करण्याची मागणी पक्षश्रेष्ठींकडे केली होती. दरम्यान, आता त्यांनी आपल्या विधानावरून युटूर्न घेतला. आज भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार नसल्याचं सूचक पद्धतीने विधान केलं.
चंद्राबाबू नायडूंना चार मंत्रिपदे, तर नितीशकुमारांना दोन मंत्रिपदे ! ‘ही’ खास व्यक्तीही मंत्रिमंडळात
कार्यकर्त्यांना संबोधित करतांना फडणवीस म्हणाले, मी निराश झालो असं कोणाला वाटत असेल किंवा भावनेच्या भरात बोललो असं वाटत असेल तर ते सत्य नाही. आज मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की माझ्याही डोक्यात काही स्ट्रॅटेजी होती आणि आजही आहे. त्यामुळेच मी अमित शाहांना भेटून आलो. त्यांनीही मला सांगितले की, पहिलं हे काम आहे तसं चालू द्या. त्यानंतर महाराष्ट्रात काय ब्लू प्रिंट करायची ती करूयात. त्यामुळं कोणत्याही परिस्थितीत मी एक मिनिटही शांत बसणार नाही. एक गोष्ट तुम्हाला निश्चित सांगतो आता तर मी काम करतोच आहे आणि करणारच आहे, असं फडणवीस म्हणाले.
यावेळी त्यांनी पुरंदरच्या तहाचा दाखला देत आपले प्रेरणास्थान छत्रपती शिवराय असल्याचे सांगत शिवाजी महाराजांसारखे हारलेले किल्ले आपण पुन्हा मिळवू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मराठी माणूस ठाकरेंसोबत गेला नाही
उद्धव ठाकरेंबद्दल कमालीची सहानुभूती आहे, असे नरेटिव्ह तयार केलं गेलं. सहानुभूती असती तर मुंबई आणि कोकणात दिसायला पाहिजे होती. ठाण्यापासून ते कोकणच्या टोकापर्यंत उद्धव ठाकरेंना एकही जागा मिळाली नाही. आदित्य ठाकरेंच्या दक्षिण मुंबईतील वरळीमध्ये अवघ्या ६ हजाराचा लीड आहे. याचा अर्थ मराठी माणूस त्यांच्यासोबत गेला नाही, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.