Human Cocaine : ‘ह्युमन कोकेन’चा ट्रेलर अखेर विविध माध्यमांवर प्रदर्शित झाला असून काही क्षणांतच प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. धक्कादायक दृश्यांची मालिकाच जणू या ट्रेलरमध्ये उलगडत जाते. गुन्हेगारी, अंमली पदार्थांचा व्यापार आणि अस्तित्वासाठी सुरू असलेल्या निष्ठूर संघर्षाच्या लपलेल्या जगाचे उघड, क्रूर आणि निःसंकोच चित्रण यातून दिसते.
या ट्रेलरमध्ये (Human Cocaine) पुष्कर जोग अगदी नव्याच रूपात झळकतो. तो पहिल्यांदाच हिंदी चित्रपटात झळकणार असून त्याची महत्वपूर्ण भूमिका आहे. एका भयावह जाळ्यात अडकलेला कैद्याची तो भूमिका साकारत आहे. जिथे सुटकेची किंचितही शक्यता उरलेली नाही. रोमँटिक आणि हलक्या भूमिकांसाठी ओळखली जाणारी इशिता राज प्रथमच एका काळोख्या आणि धगधगत्या व्यक्तिरेखेत दिसते. पुष्करसोबत कैद झालेली तिची भूमिका ट्रेलरला भावनिकता देते आणि प्रत्येक पडद्यावरील क्षणातील तणाव आणखी गहिरा करते.
सिद्धांत कपूर (Siddhant Kapoor) आपल्या हटके आणि धाडसी रूपात लक्ष वेधून घेतो. त्याचे रूप, त्याची उपस्थिती सर्व काही रहस्य आणि अस्वस्थता वाढवणारे आहे. तर ज्येष्ठ अभिनेते जाकीर हुसेन (Zakir Hussain) अंगावर काटा आणणाऱ्या भूमिकेत दिसत आहेत. पडद्यावर त्यांची उपस्थितीच भीती निर्माण करण्यास पुरेशी ठरते.
‘ह्युमन कोकेन’ ही कथा अत्यंत महागड्या, नव्या आणि मानवी मन सुन्न करणाऱ्या अमानुष प्रक्रियेतून तयार होणाऱ्या कोकेनच्या प्रकाराभोवती फिरते. या निःसंवेदनशील सत्याच्या गर्तेत पुष्कर जोग आणि इशिता राज सापडतात आणि त्यांचा या भीषण अंधाऱ्या जगात कसा ऱ्हास होतो, याची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. निखळ वास्तवावर आधारित ही कथा अंडरवर्ल्डच्या अंधाऱ्या आणि दडवलेल्या जगाचा पर्दाफाश करणारी आहे.
चित्रपटाबद्दल बोलताना पुष्कर जोग म्हणतात, ” ‘ह्युमन कोकेन’ने मला कलाकार आणि माणूस म्हणून आकार दिला आहे. माझ्या व्यक्तिरेखेची असहाय्यता, भीती आणि अंतर्गत तडफड कॅमेरा बंद झाल्यानंतरही मनात रेंगाळत राहिली. हा माझ्या कारकिर्दीतील सर्वांत महत्वाच्या प्रकल्पांपैकी एक आहे.”
दिग्दर्शक व लेखक सारिम मोमिन म्हणतात, ” ‘ह्युमन कोकेन’ हे आपल्या आसपास दबा धरून बसलेल्या भयावह वास्तवाचे प्रतिबिंब आहे. हा चित्रपट सोपा नाही, तो जाणूनबुजून अस्वस्थ करण्यासाठी, विचारांना कुरवाळण्यासाठी आणि संवादाला चालना देण्यासाठीच बनवला आहे. प्रत्येक व्यक्तिरेखेच्या माध्यमातून समाजातील लपलेली बाजू उजेडात आणली आहे.”
इशिता राज, सिद्धांत कपूर, जाकीर हुसेन आणि काही प्रभावी ब्रिटीश कलाकारांच्या दमदार भूमिकांनी सजलेला हा चित्रपट आंतरराष्ट्रीय धाटणीचा अनुभव देतो. सारिम मोमिन लिखित–दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती स्कार्लेट स्लेट स्टुडिओज, वाइनलाइट लिमिटेड, टेक्स्टस्टेप सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड आणि गूजबम्प्स एंटरटेनमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली आहे. निर्माते ची तेंग जू आणि हरीत देसाई. छायाचित्रण सोपन पुरंदरे, संपादन संदीप फ्रान्सिस, दमदार पार्श्वसंगीत क्षितिज तारे यांचे असून नृत्यदिग्दर्शन पवन शेट्टी व खालिद शेख यांनी सांभाळले आहे.
भारतीय संघाला दोन प्रशिक्षकांची गरज? कपिल देव म्हणतो, प्रत्येकाला पैसे…
युनायटेड किंगडममध्ये बऱ्याच प्रमाणात चित्रीत झालेला ‘ह्युमन कोकेन’ हा केवळ चित्रपट नसून आपण जाणीवपूर्वक टाळत असलेल्या, भयावह आणि काळोख्या जगाचे खरे, कठोर आणि निःसंकोच प्रतिबिंब आहे. हा चित्रपट 16 जानेवारी 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे.
