Download App

साऊथ स्टार ‘थलापती विजय’ची राजकारणात एन्ट्री! नव्या राजकीय पक्षाची घोषणा

Thalapathy Vijay in Politics : दाक्षिणात्य चित्रपटांतील प्रसिद्ध अभिनेता थलापती विजय (Thalapathy Vijay) राजकारणात येणार याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. या चर्चा खऱ्या असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. अभिनेता थलापती विजय याने लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) तोंडावर नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली आहे. ‘तमिळगा वेत्री काझीम’ असे विजयच्या नव्या पक्षाचे नाव आहे. विजयने पक्षाची स्थापना केली असली तरी आगामी लोकसभा निवडणुकीत उतरणार नाही तसेच कोणत्याही राजकीय पक्षाला समर्थन देणार नाही, असे थलापती विजयने स्पष्ट केले आहे.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की पक्षाची नोंदणी करण्यासाठी आज निवडणूक आयोगाला अर्ज सादर केला जाणार आहे. सन 2026 मध्ये तामिळनाडूत होणाऱ्या (Tamil Nadu Elections) विधानसभा निवडणुकीत मिळवण्याचे आमचे लक्ष्य असल्याचे विजय म्हणाले. दाक्षिणात्य चित्रपटात थलापती विजय याची मोठी लोकप्रियता आहे. रजनीकांत नंतर विजयचे सर्वाधिक चाहते आहेत. विजयकडून एखाद्या चित्रपटाची घोषणा होताच चाहत्यांत प्रचंड उत्सुकता निर्माण होते. मागील अनेक वर्षांपासून विजय अभिनय क्षेत्रात काम करत आहे. त्यानंतर आता त्याने राजकारणातही उडी घेतली आहे.

दरम्यान, याआधी सुपरस्टार रजनीकांत सुद्धा राजकारणात येण्याची चर्चा होती. राजकीय पक्षाची स्थापना करणार असल्याचेही बोलले जात होते. मात्र पुढे त्यांनी हा विचार सोडून दिला. राजकारणाऐवजी अभिनयालाच प्राधान्य देणं त्यांनी पसंत केलं. परंतु, थलापती विजयने थेट राजकीय इरादे स्पष्ट केले आहेत. थेट राजकीय पक्षाची घोषणाच करून टाकली आहे. लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर हा निर्णय घेतला असला तरी त्यांचा पक्ष लोकसभेच्या रिंगणात उतरणार नाही हेही स्पष्ट झाले आहे.

‘यूपी-बिहारचे लोक तामिळनाडूत टॉयलेट साफ करतात’ द्रमुकच्या खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य

2026 मध्ये तामिळनाडूत विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांवर पक्ष फोकस करणार असल्याचे विजयने निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री एम. के स्टालिन (MK Stalin) यांच्या द्रमुकसाठी आणखी एक आव्हान निर्माण झाल्याचे सध्या तरी दिसत आहे. परंतु, आगामी काळात काय राजकीय घडामोडी घडतात यावरच विजयच्या नव्या राजकीय पक्षाची वाटचाल अवलंबून राहणार आहे.

follow us