सुपरस्टार थलापती विजयची अभिनयातून निवृत्ती; स्वत:च केली मोठी घोषणा
विजय यांनी ही घोषणा २७ डिसेंबर २०२५ रोजी मलेशियामध्ये दिग्दर्शक एच. विनोद यांच्या 'जन नायकन' या चित्रपटाच्या ऑडिओ लाँचदरम्यान केली
अभिनेता विजय थलापती यांनी त्यांच्या अभिनय कारकिर्दीतून निवृत्ती जाहीर केली आहे. (Vijay) ३३ वर्षांच्या प्रदीर्घ चित्रपट कारकिर्दीनंतर त्यांनी चित्रपटसृष्टीतून निरोप घेण्याचा निर्णय घेतला आहे. विजय यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात १० वर्षांच्या वयात तमिळ चित्रपट ‘वेट्री’मधून बालकलाकार म्हणून केली होती. १८ वर्षांचे असताना त्यांनी ‘नालैया थीरपू’ (१९९२) या चित्रपटातून नायक म्हणून पदार्पण केलं होतं.
विजय यांनी ही घोषणा २७ डिसेंबर २०२५ रोजी मलेशियामध्ये दिग्दर्शक एच. विनोद यांच्या ‘जन नायकन’ या चित्रपटाच्या ऑडिओ लाँचदरम्यान केली. ते सध्या ५१ वर्षांचे आहेत आणि ‘जन नायकन’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट असेल. मंचावरून त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की, आता ते पूर्णपणे राजकारणावर लक्ष केंद्रित करणार आहेत.
होऊ दे धुरळा! दाक्षिणात्य सुपरस्टार थलापती विजयचं अनोख रेकॉर्ड; Leoने परदेशात रचला इतिहास
गेल्या वर्षी त्यांनी ‘तमिळगा वेट्री कझगम’ हा आपला राजकीय पक्ष स्थापन केला होता आणि आता त्यांचा पक्ष २०२६ मध्ये होणारी तामिळनाडू विधानसभा निवडणूक लढवणार आहे. दरम्यान, चाहत्यांना संबोधित करताना ते म्हणाले, “माझ्यासाठी एकच गोष्ट महत्त्वाची आहे. लोक माझ्यासाठी थिएटरमध्ये येतात आणि रांगेत उभे राहतात. म्हणून मला पुढील 30–33 वर्षे त्यांच्यासाठी उभे राहायचे आहे. याच चाहत्यांसाठी मी सिनेमातून निवृत्ती घेत आहे.
करिअरच्या पहिल्या दिवसापासून त्यांना सर्व प्रकारच्या टीकेला सामोरं जावं लागलं आहे. तरीही त्यांचे चाहते नेहमी त्यांच्यासोबत उभे राहिले. 33 वर्षांपासून मिळालेले हे प्रेम आणि समर्थन ते कधीही विसरणार नाही असंही ते म्हणाले. विजयच्या २०१५ च्या ‘पुली’ चित्रपटानंतर त्यांचा कोणताही चित्रपट फ्लॉप झाला नाही. ‘बीस्ट’ (२०२२), ‘वारिसु’ (२०२३) आणि ‘द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम’ (GOAT, २०२४) यांसारख्या चित्रपटांना मिश्र प्रतिक्रिया मिळाल्या, परंतु कमाई चांगली झाली आहे.
