CM Mamata Banerjee Statement On Urgapur Gangrape Case : पश्चिम बंगाल पुन्हा एकदा निर्भयासारख्या भयानक घटनेने थरारून गेलंय. दुर्गापूरमधील एका खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या एमबीबीएसच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. ही विद्यार्थिनी ओडिशातील जलेश्वर येथील रहिवासी असून ती दुसऱ्या वर्षात वैद्यकीय शिक्षण घेत होती.
तरूणीवर सामूहिक बलात्कार
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी शनिवारी रात्री आपल्या मित्रासोबत जेवायला बाहेर गेली होती. त्याचवेळी काही स्थानिक तरुणांनी तिला एकटी पाहून जबरदस्तीने ओढून नेले आणि तिच्यावर बलात्कार (Urgapur Gangrape) केला. घटनेच्या वेळी तिचा मित्र तिथून पळून गेला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली असून विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं (CM Mamata Banerjee) आहे.
चार आरोपींना अटक
दरम्यान, पोलिसांनी तत्काळ कारवाई करत चार आरोपींना (West Bengal) अटक केली आहे. त्यांची ओळख अपू बौरी (21), फिरदौस शेख (23), शेख रियाझुद्दीन (31) आणि शेख सोफिकूल अशी पटली आहे. हे सर्व आरोपी स्थानिक रहिवासी असून, त्यांना न्यायालयात हजर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिसांनी घटनेचा तपास वेगाने सुरू केला असून आणखी कोणाचा सहभाग आहे का, याची चौकशी केली जात आहे.
ममता बॅनर्जी यांनी केलेलं विधान
या घटनेवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलेलं विधान मोठ्या वादाचं कारण ठरलं आहे. बॅनर्जी म्हणाल्या, मुलींनी रात्री उशिरा कॉलेज किंवा बाहेरील परिसरात जाणं टाळावं. त्यांनी स्वतःच्या सुरक्षेची काळजी घ्यायला हवी. हा जंगलाचा भाग आहे आणि पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. दोषींना कठोर शिक्षा होईल. त्यांच्या या वक्तव्यावर प्रचंड टीका झाली असून, विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर महिलांविरोधी मानसिकतेचा आरोप केला आहे. ममता बॅनर्जी यांनी पुढे असंही म्हटलं की, या घटनेत सरकारला जबाबदार धरणं योग्य नाही, कारण मुलींच्या सुरक्षेची जबाबदारी खाजगी वैद्यकीय महाविद्यालयाची होती. मात्र, त्यांनी आरोपींना शिक्षा होईल असं आश्वासन दिलं.
निदर्शने सुरू
विरोधकांचा आरोप आहे की, मुख्यमंत्री पीडितेऐवजी तिच्याच हालचालींवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून गुन्हेगारांना अप्रत्यक्षरित्या संरक्षण देत आहेत. काँग्रेस, भाजप आणि महिलांच्या संघटनांनी राज्य सरकारच्या भूमिकेचा निषेध केला आहे. दरम्यान, दुर्गापूरमधील वैद्यकीय विद्यार्थ्यांनी या घटनेविरोधात निदर्शने सुरू केली असून, “सेफ कॅम्पस, सेफ बंगाल” अशी घोषणा देत कठोर न्यायाची मागणी केली आहे.