Swargate Rape : निवडणुकीतील उमेदवार ते अजितदादांच्या आमदारासोबत फोटो; गाडेची कुंडली कशी?

पुणे : स्वारगेट आगारात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरूणीवर बलात्काराच्या (Swargate Depo Rape Case) घटनेनं मोठी खळबळ उडालेली असतानाच आता या घटनेतील आरोपी दत्तात्रय गाडे (Dattatray Gade) हा गावच्या निवडणुकीत उमेदवार होता अशी माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे गाडे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर राजकीय वरदहस्त असल्याचे तपासात समोर आल्याचे सांगितले जात आहे.(Swargate Bus Depo Rape Update)
गावच्या निवडणुकीत गाडे होता उमेदवार
दत्तात्रय गाडे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहे. गाडे हा मुळचा शिरुर तालुक्यातील गुणाट या गावचा रहिवाशी असून, गुणाट गावाच्या तंटामुक्ती निवडणुकीसाठीदेखील तो उमेदवार म्हणून उभा राहिला होता. मात्र, त्या निवडणुकीत त्याचा पराभव झाल्याचे वृत्त महाराष्ट्र टाईम्सने दिले आहे. याशिवाय गाडे याने अन्य निवडणूक काळात एका राजकीय नेत्याचे कामही केल्याचे सांगितले जाते. संबंधित राजकीय नेत्यासोबत गाडेचे फोटोदेखील व्हायरल झाले आहेत. त्यामुळे गाडेवर राजकीय वरदहस्त असल्याची चर्चा यामुळे सुरू झाली आहे.
‘जीव जळतोय…’ उद्धव ठाकरेंकडून वसंत मोरेंच्या कृतीचं समर्थन, ऑडिओ क्लिप…
लिफ्टदेऊन महिलांची करायचा लूट
गाडे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्यावर विविध गुन्हे दाखल आहेत. गाडे नेहमी नियोजन करून गुन्ह्याला तडीस नेत असे. यासाठी त्याची एक पद्धत ठरलेली होती. वृद्धमहिलांना लिफ्ट देण्याच्या बहाण्याने गाडे त्यांना कारमध्ये बसवत असे आणि त्यांच्याकडील मौल्यवान वस्तू लुटत असे. पण, एका महिलेच्या प्रसंगवधानाने गाडे पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
कर्ज काढून घेतली कार
गाडेकडे वडिलोपार्जित तीन एकर शेतजमीन असून, आई-वडील शेतात काम करतात. तसेच दत्तात्रय गाडेची पत्नी, लहान मुले आहेत मात्र, दत्तात्रय गाडे कोणतेही काम करत नव्हता. त्याला झ़टपट पैसा कमवायचा होता. त्यामुळे तो लुटमार आणि चोऱ्या करू लागल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. एवढेच नव्हे तर, गाडेने 2019 मध्ये कर्ज काढून चारचाकी गाडी घेतली होती. ही कार तो पुणे ते अहिल्यानगरदरम्यान प्रवाशी वाहतुकीसाठी करत होता. यादरम्यान जास्त दागिने असलेल्या महिलांना तो लिफ्ट देत आणि मग आडमार्गला नेऊन त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील दागिने चोरायचा असेदेखील सांगितले जाते.
स्वारगेट प्रकरण, आरोपी दत्तात्रय गाडेचा तरुणीवर दोनदा अत्याचार, मेडिकल रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा
पोलीस अन् राजकीय नेत्यांशी संपर्क
दत्तात्रय गाडे हा एका प्रमुख लोकप्रतिनिधीचा कार्यकर्ता असल्याचे आणि त्याचा पोलिसांसोबतही संपर्क असल्याची प्राथमिक माहितीमधून समोर आली आहे. गाडे हा पीएमपी एसटी स्थानकात वावरत असायचा अन् तेथील तरूणी अन् महिलांना पोलिस असल्याचे भासवत जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत असल्याची धक्कादायक बाबही तपासात समोर आल्याचे सांगितले जात आहे.
अशोक पवारांच्या फ्लेक्सवर गाडेचा फोटो
शिरूरचे माजी आमदार अशोक पवार यांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेल्या फ्लेक्सवर आरोपी दत्तात्रय गाडेचा फोटो असल्याचे समोर आले आहे. एवढेच नव्हे तर, गाडे याच्या व्हॉट्सअप डीपीवर विद्यामान आमदार माऊली कटके यांचा फोटो असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे गाडे नेमका कोणत्या राजकीय नेत्याचा कार्यकर्ता आहे यावर अनेक चर्चांना तोंड फुटले असून, आरोपीने माझा फोटो डीपीला ठेवला म्हणून तो माझा कार्यकर्ता होत नाही अशी प्रतिक्रिया शिरूरचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी दिली आहे. तसेच आरोपीचा आणि माझा कसलाही संबंध नसल्याचे म्हटले आहे.
स्वारगेट बस प्रकरण, परिवहन मंत्र्यांची मोठी कारवाई, डेपोतील 23 सुरक्षारक्षक सस्पेंड
1 लाखांचे बक्षीस जाहीर
दुसरीकडे स्वारगेट बसस्थानकात घडलेल्या घटनेतील आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांची विविध पथकं रवाना करण्यात आली असून, 13 पथकांकडून गाडेचा शोध घेतला जात असून, तांत्रिक विश्लेषणावरून देखील माहिती घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. आरोपीच्या कुटुंबाला देखील चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून आरोपीला शोधून देणाऱ्यास एक लाखाचं बक्षीस देखील जाहीर केल्याची माहिती डीसीपी स्मार्तना पाटील यांनी दिली आहे.