Israel Hamas War : इस्त्रायल हमास यांच्यातील यु्द्ध (Israel Hamas War) अजूनही संपलेलं नाही. हमासचा खात्मा करण्याच्या इराद्याने मैदानात उतरलेल्या इस्त्रायलने हल्ले आणखी तीव्र केले आहेत. आता या युद्धाच्या मैदानातून आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. इस्त्रायलने जमिनीवरील लढाई आणखी तीव्र केली असून गाझा पट्टीत (Gaza) तुफान बॉम्बफेक केली जात आहे. येथील संपर्क सेवा देखील बंद करण्यात आली आहे. त्यामुळे युद्ध आणखीनच चिघळले आहे. इस्त्रायलने शुक्रवार गाझा पट्टीत तुफान बॉम्बफेक केली. त्यामुळे या भागातील इंटरनेट सेवा पूर्णतः विस्कळीत झाली. तसेच येथील संपर्कही तुटला.
Israel Hamas War : …म्हणून हमासचा इस्त्रायलवर हल्ला, थेट भारताशी कनेक्शन; बायडेन यांचा दावा
गाझा भागात जमिनीवरील कारवाईची तयारी इस्त्रायली सैन्याकडून अनेक दिवसांपासून केली जात होती. येथील नागरिकांना दक्षिण गाझात स्थलांतर करण्याच्या सूचनाही सातत्याने दिल्या जात होत्या. तरीदेखील येथील नागरिक सोडून जाण्यास तयार नव्हते. इस्त्रायलने जमिनीवरून गाझात हल्ले करू नयेत यासाठी जागतिक दबावही होता. मात्र तरीदेखील या कशाचाच विचार न करता इस्त्रायलने येथील कारवाईचा विस्तार केला. 7 ऑक्टोबरच्या हल्ल्यानंतर इस्त्रायलने हमासला संपूर्ण नष्ट करण्याची शपथ घेतली आहे. सततच्या हवाई हल्ल्यांमुळे शुक्रवारी गाझा शहर हादरले. येथील इंटरनेट सेवा आणि दळणवळणाच्या सुविधा प्रभावित झाल्या.
या ब्लॅकआउटमुळे नवीन हल्ल्यात किती जणांचा मृत्यू झाला याची माहिती मिळू शकली नाही. तसेच फोन बंद पडल्याने रुग्णवाहिकांना फोन करून रुग्णालयात नेण्यातही अडचणी निर्माण झाल्या. या भागात अनेक दिवसांपासून वीज नाही. त्यानंतर आता इंटरनेट आणि फोन सेवाही बंद झाल्याने येथील नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. युद्धविराम लागू करण्याची मागणी सातत्याने होत असताना इस्त्रायल मात्र त्या मूडमध्ये आजिबात दिसत नाही. त्यांच्याकडून आता आरपारची लढाई सुरू करण्यात आल्याचे दिसत आहे.
मोठी बातमी! अमेरिकेत अंदाधुंद गोळीबार, 22 ठार तर 60 जण जखमी
जॉर्डनच्या प्रस्तावाला संयुक्त राष्ट्र सभेत मंजुरी
इस्त्रायल हमास युद्धादरम्यान गाझा मानवतावादी आधारावर यु्द्धबंदीसाठी जॉर्डनने मांडलेला प्रस्ताव संयुक्त राष्ट्र महासभेत प्रचंड बहुमताने मंजूर करण्यात आला. प्रस्तावाच्या बाजूने 120 तर विरोधात 14 मते पडली. तर 45 देश मतदानापासून दूर राहिले. या ठरावात इस्त्रायल आणि हमास यांच्यात मानवतावादी आधारावर तत्काळ युद्धविराम करण्याची मागणी करण्यात आली आहे. पाणी, वीज आणि अन्य जीवनाश्यक वस्तूंचे वितरण सुरळीत करण्यासाठी गाझापर्यंत अडचणी न आणता मदत पोहोच व्हावी, अशी मागणी या प्रस्तावात करण्यात आली आहे. अमेरिका, इस्त्रायल, ऑस्ट्रिया, क्रोएशिया, झेक प्रजासत्ताक, फिजी, ग्वाटेमाला, हंगेरी, मार्शल बेटे, मायक्रोनिशिया, नाउरू, पापुआ न्यू गिनी, पराग्वे आणि टोंगा या देशांनी जॉर्डनच्या प्रस्तावाच्या विरोधात मतदान केले.