Russia Ukraine War Latest Updates : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबवण्याचे (Russia Ukraine War) सर्व प्रयत्न अपयशी ठरले आहेत. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची (Vladimir Putin) नुकतीच भेट झाली होती. या बैठकीतही युद्धावर कोणताच तोडगा काढता (Ukraine Crisis) आला नाही. आताही युद्धाच्या मैदानातून एक मोठी बातमी समोर आली आहे. रशियाने युक्रेनची राजधानी कीव येथील युरोपियन युनियनच्या प्रतिनिधी मंडळाच्या इमारतीवर मोठा हल्ला केला आहे.
रशियाने राजधानी कीव शहरावर मोठे हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमध्ये किमान 14 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि 48 जण जखमी झाले आहेत. यु्क्रेनच्या परराष्ट्र मंत्री आंद्रेई सिबिहा यांनी एक्सवर पोस्ट करत याबाबत माहिती दिली. रशियाच्या हल्ल्यात युरोपियन युनियनच्या इमारतीचे मोठे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांनी देखील या माहितीला दुजोरा दिला आहे. रशियाच्या हल्ल्यात 14 लोकांचा मृत्यू झाला यात तीन मुलांचा समावेश होता असे त्यांनी सांगितले. युरोपियन युनियनच्या इमारतीसह अनेक ठिकाणी नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले.
रशिया खवळला! युक्रेनच्या 143 ठिकाणांवर तुफान हल्ले; दोन गावांवरही केला कब्जा
युक्रेनमधील युरोपीय युनियनचे अध्यक्ष एंटोनियो कोस्टा यांनी देखील या हल्ल्यांची पुष्टी केली आहे. हल्ल्यात नुकसानग्रस्त झालेल्या इमारतीचा फोटो त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला. युक्रेनवरील घातक मिसाइल हल्ल्यांमुळे मी भयभीत झालो असे त्यांनी सांगितले. युद्ध संपवण्याचा मार्ग रशियाकडून स्वीकारला जात नाही. तर आणखी हल्ले केले जात आहेत. कीवमध्ये एकाच रात्रीत अनेक इमारती नुकसानग्रस्त झाल्या. निवासी परिसर, ऑफीस सेंटर्सचीही पडझड झाली आहे. आता जगानेच रशियाला उत्तर देण्याची गरज आहे. रशियाला कोणत्याही परिस्थितीत युद्ध थांबवावच लागेल असेही त्यांनी स्पष्ट केले.
रशियाकडून सातत्याने युद्धविराम नाकारला जात आहे. चर्चाही टाळली जात आहे. त्यामुळे आता रशियावर आणखी कठोर निर्बंध लादण्याची गरज आहे. याच मार्गाने रशियाला वठणीवर आणले जाऊ शकते. फक्त ताकद आणि दबाव याच दोन गोष्टी रशियाला कळतात. आता रशियाला प्रत्येक हल्ल्यासाठी परिणाम भोगावे लागतील असा इशारा युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी दिला.
रशिया-युक्रेन युद्धविरामात युरोपीय आयोगाची आडकाठी; डोनाल्ड ट्रम्प यांचं स्वप्न भंगणार?
दरम्यान, युक्रेनवर एकाच रात्रीत युक्रेनवर तब्बल 629 मिसाइल्स आणि ड्रोनद्वारे हल्ले केले गेले असा दावा फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्यूयल मॅक्रों यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे केला आहे. या हल्ल्यांत लहान मुलांसह 14 लोकांचा मृत्यू झाला आहे. रहिवासी इमारती आणि सिव्हील इन्फ्रास्ट्रक्चर्सना जाणूनबुजून टार्गेट करण्यात आलं असाही दावा मॅक्रों यांनी केला आहे.