Speedboat carrying Indian tourists capsized : व्हिएतनामच्या दक्षिण भागातील फु क्वोक बेटाजवळ शनिवारी भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी एक स्पीडबोट उलटून भीषण दुर्घटना घडली आहे. या अपघातात किमान 15 भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. काही प्रवासी बेपत्ता असल्याने त्यांचा शोध घेण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचाव आणि शोधमोहीम सुरू आहे. व्हिएतनामी वृत्तसंस्था व्हीएन एक्सप्रेस इंटरनॅश्नलच्या माहितीनुसार, ओशन पर्ल आयलंड कंपनीची ही स्पीडबोट होन मे रून बेटावरून अन थोइ बंदराकडे निघाली होती.
बोटीत 32 भारतीय पर्यटक आणि चार कर्मचारी असे एकूण 36 जण होते. दुपारी सुमारे एक वाजण्याच्या सुमारास होन मे रुट नगोआई बेटापासून सुमारे 400 मीटर अंतरावर ही स्पीडबोट अचानक उलटली आणि सर्व प्रवासी समुद्रात फेकले गेले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील पर्यटकांच्या अनेक बोटी तातडीने घटनास्थळी पोहोचल्या आणि बचावकार्य सुरू करण्यात आले. बचाव मोहिमेत सहभागी झालेल्या एका बोटचालकाने सांगितले की, त्यांची बोट अवघ्या पाच मिनिटांत घटनास्थळी पोहोचली होती. मात्र, अनेक प्रवासी उलटलेल्या बोटीच्या आत अडकले असल्याने त्यांना बाहेर काढणे अत्यंत कठीण झाले. काही मोजकेच प्रवासी शुद्धीवर असताना बाहेर काढता आले.
BP, मधुमेह, हृदयविकाराच्या रुग्णांना मोठा दिलासा! 39 अत्यावश्यक औषधांच्या किंमती केंद्राने निश्चित केल्या
दरम्यान, या दुर्घटनेनंतर व्हिएतनाममधील भारतीय दूतावासाने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले असून स्थानिक प्रशासनाशी सातत्याने संपर्क सुरू असल्याचे सांगितले आहे. प्रभावित भारतीय नागरिकांच्या कुटुंबीयांना मदत आणि माहिती मिळावी यासाठी हो ची मिन्ह सिटी आणि हनोई येथे नियंत्रण कक्षही सुरू करण्यात आले आहेत. भारतीय दूतावासाने सामाजिक माध्यमांवर दिलेल्या माहितीनुसार, फु क्वोक बेटाजवळ भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून बचावकार्य सुरू असल्याने मृत आणि जखमींची अचूक संख्या अद्याप निश्चित करण्यात येत आहे. गरज भासल्यास भारतीय नागरिकांना सर्वतोपरी मदत केली जाईल, असेही दूतावासाने स्पष्ट केले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, अपघाताच्या वेळी समुद्रात लाटा मोठ्या प्रमाणात उसळत होत्या. पाऊस नसतानाही समुद्र खवळलेला होता. तरीही त्या भागात पर्यटकांच्या बोटींची वाहतूक सुरू होती. संबंधित कंपनीच्या प्रतिनिधीने सांगितले की, ही स्पीडबोट पर्यटकांना बेटांवरील पर्यटनासाठी घेऊन जात होती. बोटीचा चालक अनुभवी असून अनेक वर्षांपासून प्रवासी बोटी चालवत आहे.
मे रुट बेट हे फु क्वोकजवळील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असून स्वच्छ समुद्र, पांढऱ्या वाळूचे किनारे आणि प्रवाळ खडकांमुळे ते पर्यटकांचे आकर्षण मानले जाते. स्नॉर्कलिंग, स्कूबा डायव्हिंग आणि आयलंड-हॉपिंगसाठी दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक येथे भेट देतात. मात्र, या भीषण दुर्घटनेमुळे या पर्यटनस्थळावर शोककळा पसरली आहे.
