सोलापूरच्या तांदूळवाडी दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या भाविकांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून प्रत्येकी 5 लाखांची मदत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या 8 भाविकांच्य वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.
Chief Minister Fadnavis announces aid : सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी येथे झालेल्या भीषण अपघातानंतर राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबियांना दिलासा देणारा महत्वाचा असा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या 8 भाविकांच्य वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. या घोषणेमुळे शोकाकुल कुटुंबांना सरकरांकडून काहीसा आधार देण्याचा हा प्रयत्न असल्याचं यावेळी सांगण्यात आलं.
म्हसवड येथील प्रसिद्ध सिध्दनाथ देवस्थानचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या पिकअप वाहनाच्या तांदुळवाडी गावाजवळ भीषण अपघात झाला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पिकअप रस्त्यालगत असलेल्या खोल विहिरीत कोसळली. या दुर्घटनेत एकूण 8 जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, तर 7 जणांना स्थानिक नागरिक, बचाव पथक आणि प्रशासनाच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात आले. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या दुर्घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने प्रशासनाशी संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला. अपघातात भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी असल्याचे सांगत त्यांनी मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. तसेच मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात राज्य सरकार सहभागी असल्याची भावना व्यक्त केली.
उपोषण संपले, पण लढा नाही; कर्जमाफीच्या मुद्द्यावर 4 जुलैला मोठ्या आंदोलनाचा रोहित पवारांचा इशारा
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक घटनास्थळी रवाना झाले असून बचाव आणि मदतकार्यावर प्रशासनाचे बारकाईने लक्ष आहे. जखमींना आवश्यक ते सर्व उपचार उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या आहेत. याचबरोबर मृतांच्या वारसांना राज्य सरकारकडून प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.
दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. तांदूळवाडी गावाजवळ घडलेली ही दुर्घटना मन हेलावून टाकणारी असून सिद्धनाथाच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाने घाला घातल्याचे त्यांनी म्हटले. मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून परिस्थितीची माहिती घेतली. बाधित कुटुंबांना आणि जखमींना तातडीने सर्व प्रकारची मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या.
प्राथमिक माहितीनुसार, पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावातील भाविक सिद्धनाथ देवस्थानाच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून गावाकडे परतत असताना तांदूळवाडी परिसरात हा भीषण अपघात घडला. वाहनात लहान मुलांसह एकूण 14 प्रवासी होते. अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेली आर्थिक मदत ही दुःखाची भरपाई नसली तरी संकटाच्या काळात मृतांच्या कुटुंबीयांना आधार देणारी ठरणार आहे. या घटनेनंतर प्रशासनाकडून अपघाताच्या नेमक्या कारणांचा तपास सुरू करण्यात आला आहे.