जावा समुद्र खवळल्याने लाटांचा कहर; 243 प्रवाशांची फेरी बोट उलटली, 6 जणांचा मृत्यू
Boat Accident In Java Sea : या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला असून 97 प्रवाशांची सुटका करण्यात आली आहे. बोटीवर एकूण 243 प्रवासी होते.
Boat Accident In Java Sea : इंडोनेशियाच्या जावा समुद्रात खराब () हवामानामुळे Virgo Transport 8 ही फेरी बोट उलटल्याची दुर्घटना घडली. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला असून 97 प्रवाशांची सुटका करण्यात आली आहे. बोटीवर एकूण 243 प्रवासी होते. उर्वरित प्रवाशांचा शोध घेण्यासाठी इंडोनेशियाच्या सर्च अँड रेस्क्यू एजन्सीसह नौदल, मरीन पोलिस आणि अन्य यंत्रणांनी बचावमोहीम सुरू केली आहे.
ही फेरी बोट शनिवारी सकाळी 10:33 वाजता सुराबाया येथून दक्षिण कालीमंतनमधील बंजारमासिनकडे रवाना झाली होती. रविवारी दुपारी 2 वाजता ती बंजारमासिनला पोहोचणे अपेक्षित होते. मात्र, रविवारी पहाटे सुमारे 2 वाजता बोटीशी संपर्क तुटला. त्यावेळी बंजारमासिनपासून सुमारे 150 किलोमीटर दक्षिणेकडे असलेल्या समुद्रात ती संकटात सापडली होती. ऑपरेटर कंपनी PT Virgo ला सकाळी 4:10 वाजता पहिल्यांदा मदतीची सूचना मिळाली.
दुर्घटनेची माहिती मिळताच विविध यंत्रणांनी संयुक्त बचावमोहीम हाती घेतली. घटनास्थळी अनेक जहाजे आणि एक हेलिकॉप्टर पाठवण्यात आले असून, जावा समुद्राच्या आसपास असलेल्या इतर जहाजांनाही शोधकार्यात सहभागी करून घेण्यात आले आहे. समुद्रात प्रवासी आढळल्यास तातडीने माहिती देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बचावकार्य आणि दुर्घटनेची माहिती देण्यासाठी रविवारी सकाळी त्रिसक्ती पोर्ट परिसरात ऑपरेशन सेंटर स्थापन करण्यात आले.
दरम्यान, बंजारमासिन येथील रुस्मिलावती या आपल्या 8 नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी बंदरावर पोहोचल्या. जावामधील इस्लामिक विद्वानांच्या थडग्यांना भेट देऊन हे पर्यटक बोटीने बंजारमासिनला परतत होते. कुटुंबीयांना शेवटचा व्हॉट्सॲप स्टेटस एका नातेवाईकाकडून मिळाला होता. त्यात त्याने समुद्रातील प्रचंड लाटांबद्दल भीती व्यक्त केली होती. रविवारी दुपारपर्यंतही त्यांच्या नातेवाईकांबाबत कोणतीही माहिती मिळालेली नव्हती. इंडोनेशियात गेल्या महिन्याच्या सुरुवातीला मदुरा बेटाजवळ फेरी बोटीला आग लागून 5 जणांचा मृत्यू झाला होता. 17,000 हून अधिक बेटे असलेल्या या देशात फेरी बोटी जलवाहतुकीचे प्रमुख साधन आहेत.