मथुरेत भाविकांनी भरलेल्या बोटीला अपघात होऊन 9 जणांना जलसमाधी तर 22 जणांना वाचवण्यात यश

बोट बुडाल्याने मोठी दुर्घटना घडली. या अपघातात 9 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 22 जणांना सुरक्षितरित्या वाचवण्यात यश आलं आहे.

  • Written By: Published:
Untitled Design 63

9 people die in boat accident : उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. यमुना नदीमध्ये भाविकांना घेऊन जाणारी बोट पांटून पुलाला धडकून बुडाल्याने मोठी दुर्घटना घडली. या अपघातात 9 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून २२ जणांना सुरक्षितरित्या वाचवण्यात यश आलं आहे. अनेक जण जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसर, पंजाब येथील भाविक दर्शनासाठी मथुरेत आले होते. ते वृंदावन येथील देवराहा बाबा मठाकडे जात असताना ही दुर्घटना घडली.

भाविकांनी भरलेली बोट यमुना नदीतून जात असताना पांटून पुलावर दुरुस्तीचे काम सुरू होतं. त्याचवेळी बोट चालकाचं नियंत्रण सुटल्याने बोट थेट पुलाला जाऊन धडकली आणि काही क्षणांतच बोट बुडाली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक मच्छीमार पोलिस आणि अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बचावकार्य युद्धपातळीवर राबवण्यात आलं. या रेस्क्यू ऑपरेशनदरम्यान 22 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं, मात्र 9 जणांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेनंतर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि SDRF च्या पथकांना घटनास्थळी तैनात करण्यात आलं आहे.

मथुरा ग्रामीण पोलीस अधीक्षक सुरेश चंद रावत यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आलं आणि अनेकांना जीवदान देण्यात यश आलं. दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे. जखमींना तातडीने उपचार मिळावेत तसेच मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

follow us