धक्कादायक! पोट दुखू लागल्याने स्वतःच केलं ऑपरेशन; YouTube पाहून घातले 11 टाके अन् पुढे…

Uttar Pradesh News : उत्तर प्रदेशातील मथुरा शहरातून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. वृंदावन येथील सुनरख येथील एका व्यक्तीचा कारनामा त्यालाच महागात पडला. पोटात दुखू लागलं म्हणून या युवकाने यू ट्यूबवर व्हिडिओ पाहून स्वतःच पोटाचं ऑपरेशन करुन टाकलं. ऑपरेशननंतर प्लास्टिकच्या दोऱ्याने चक्क 11 टाके देखील घातले. परंतु, नंतर त्याला त्रास सुरू झाला त्यामुळे जिल्हा संयुक्त रुग्णालयात दाखल करण्यात आले. युवकाचा कारनामा ऐकून डॉक्टरही थक्क झाले. युवकाची प्रकृती जास्तच बिघडू लागल्याने त्याला आग्रा येथील एसएन मेडिकल कॉलेज येथे रवाना करण्यात आले.
राजाबाबू असे या युवकाचे नाव आहे. बीबीएपर्यंत शिक्षण घेतलेला राजाबाबू सध्या शेती करतोय. मागील काही दिवसांपासून त्याच्य पोटात दुखत होतं. पोटदुखी कशामुळे होतेय याचा विचार करून दवाखान्यात जायला पाहिजे होतं. पण या पठ्ठ्याने चक्क यू ट्यूबची मदत घेतली. पोटाच्या ऑपरेशनसाठी आवश्यक उपकरणे व्हिडिओत पाहिली. मथुरेतील मेडिकल दुकानातून त्याने ही उपकरणे खरेदी केली.
प्रेम, लग्न अन् विश्वासघात.. पत्नीनेच काढला पतीचा ‘काटा’ सौरभ राजपूत हत्याकांडात धक्कादायक खुलासा
बुधवारी दुपारी राजाबाबूने या उपकरणांच्या मदतीने घरच्या घरीच पोटाचे ऑपरेशन केले. यानंतर चक्क प्लास्टिकच्या दोऱ्याने 11 टाकेही टाकले. त्याला वाटलं आपलं ऑपरेशन यशस्वी झालं. पण ही त्याची मोठी चूक होती. नंतर पोटात असह्य वेदना सुरू झाल्या. मग त्याला शहाणपणा सुचला. हा प्रकार घरच्यांना सांगितला. नंतर भाचा राहुल ठाकूरने राजाबाबूला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्याचा कारनामा ऐकून रुग्णालयातील डॉक्टर हैराण झाले. डॉक्टरांनी राजाबाबूला प्राथमिक उपचार दिल्यानंतर पुढील उपचारासाठी आग्र्यातील एसएन रुग्णालयात पाठवून दिले.
पोटात इन्फेक्शनचा धोका
जिल्हा रुग्णालयातील डॉ. शशी रंजन यांनी सांगितले की राजाबाबूचे पंधरा वर्षांपूर्वी अपेंडिक्सचे ऑपरेशन झाले होते. यानंतर मागील काही दिवसांपासून त्यांना पोटदुखीचा त्रास सुरू झाला होता. त्यामुळे त्याने सात सेंटीमीटरपर्यंत पोट फाडून नंतर पुन्हा टाके घातले. यामुळे पोटात इन्फेक्शनचा धोका वाढला आहे. टाके किती खोलवर आहेत याचा अंदाज नाही. त्यामुळे त्याला आग्र्याला पाठविण्यात आल्याचे डॉ. रंजन यांनी सांगितले.
धक्कादायक! पुण्यात टेम्पोला भीषण आग, चौघांचा होरपळून मृत्यू; अनेक जण जखमी