काजल अग्रवाल, श्रेयस तळपदे, दिग्दर्शक चेतन डीके आणि निर्माता सागर बी. शिंदे यांनी घेतली एफडीए आयुक्त तुकाराम मुंडे यांची भेट
महत्त्वाच्या विषयाला चित्रपटाच्या माध्यमातून अधोरेखित करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल तुकाराम मुंडे यांनी चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे कौतुक केले.
Meeting with FDA Commissioner Tukaram Mundhe : प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर असलेल्या ‘द इंडिया स्टोरी’ या चित्रपटाची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत असताना, चित्रपटातील प्रमुख कलाकार काजल अग्रवाल आणि श्रेयस तळपदे, तसेच दिग्दर्शक चेतन डीके आणि लेखक-निर्माते सागर बी. शिंदे यांनी प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेले एफडीए आयुक्त तुकाराम मुंडे यांची सदिच्छा भेट घेतली.
सार्वजनिक आरोग्य आणि अन्नसुरक्षेसारख्या अत्यंत महत्त्वाच्या विषयाला चित्रपटाच्या माध्यमातून अधोरेखित करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल तुकाराम मुंडे यांनी चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे कौतुक केले. या भेटीनंतर त्यांनी सोशल मीडियावरही आपल्या भावना व्यक्त करत, लाखो लोकांच्या जीवनाशी निगडित असलेल्या या गंभीर विषयावर चित्रपट भाष्य करत असल्याचा आनंद व्यक्त केला आणि चित्रपटाला शुभेच्छा दिल्या. अभिनेत्री काजल अग्रवाल यांनीदेखील मुंडे यांच्या प्रामाणिकपणा, कार्यतत्परता आणि जनसेवेप्रती असलेल्या समर्पणाबद्दल आपला आदर व्यक्त केला. त्यामुळे ही भेट अधिक अर्थपूर्ण ठरली.
मोदी सरकार विद्यार्थ्यांप्रती संवेदनाहीन; पत्रकार परिषद घेत राहुल गांधींकडून सरकारची पोलखोल
झी स्टुडिओज प्रस्तुत आणि एमआयजी प्रॉडक्शन अँड स्टुडिओज यांच्या सहयोगाने साकारलेल्या ‘द इंडिया स्टोरी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन चेतन डीके यांनी केले असून, चित्रपटाचे लेखन आणि निर्मिती सागर बी. शिंदे यांनी केली आहे. हा चित्रपट 24 जुलै 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये हिंदी, तेलुगू आणि तमिळ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
कीटकनाशकयुक्त शेती आणि अन्नभेसळ यांसारख्या गंभीर समस्यांवर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाने आधीच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या घातक पद्धतींचा आजच्या आणि पुढील पिढ्यांच्या आरोग्यावर होणारा परिणाम अधोरेखित करत, समाजात जागरूकता निर्माण करणे आणि या विषयावर व्यापक चर्चा घडवून आणणे हा चित्रपटाचा उद्देश आहे.
या चित्रपटाचे सहनिर्माते स्वाती विनायक साईंदाणे, अनीता जाधव, विनायक साईंदाणे, कल्पेश शाह, देवयानी खोराटे आणि प्रेम जोशी आहेत. तांत्रिक विभागात निशांत भागवत (छायांकन), मंगेश ढाकडे (संगीत), आशीष म्हात्रे (संकलन), शकील आझमी (गीतकार) आणि अनमोल भावे (ध्वनी संकल्पना) यांचा समावेश आहे.