Donald Trump : अमेरिकेची सत्ता हातात घेताच डोनाल्ड ट्रम्प यांनी (Donald Trump) अमेरिकेत बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या विदेशी नागरिकांना बाहेर काढण्याची मोहीम सुरू केली. या अवैध प्रवाशांना पु्न्हा त्यांच्या देशात पाठवले जात आहे. यातच आता ट्रम्प प्रशासनाने सोमवारी मोठी घोषणा केली आहे. बेकायदेशीर पद्धतीने जे लोक अमेरिकेत राहत आहे त्यांनी जर स्वेच्छेने त्यांच्या मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला तर अशा लोकांना 1 हजार अमेरिकी डॉलर दिले जातील अशी घोषणा ट्रम्प प्रशासनाने केली आहे.
अमेरिकी गृह सुरक्षा विभागाने सांगितले की अशा लोकांना पैसे दिले जातीलच शिवाय त्यांच्या प्रवासाचा खर्चही केला जाईल. यासाठी प्रवाशांनी सीपीबी होम अॅपचा वापर करून आम्ही मायदेशी परतण्यास तयार आहोत असे सरकारला कळवावे असे आवाहन अमेरिकी सरकारने केले आहे. अशा लोकांना अटक किंवा जबरदस्तीने बाहेर काढण्याच्या यादीतून वगळण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले आहे.
ट्रम्प सरकारविरोधात पुन्हा आंदोलन, हजारो नागरिक रस्त्यावर; अमेरिकेत काय घडतंय?
गृह सुरक्षा सचिव क्रिस्टी नोएम यांनी सांगितले की जर कुणी येथे (अमेरिकेत) बेकायदेशीर पद्धतीने राहत असेल तर त्यांनी स्वतःहून त्यांच्या देशात परतावे हाच सर्वात सोपा आणि सुरक्षित मार्ग आहे. डीएचएस अशा लोकांना मदत करत आहे तसेच त्यांना भत्ताही दिला जात आहे.
अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी या मुद्द्यावर जास्त भर दिला होता. सत्तेत आल्यानंतर त्यांनी कार्यवाहीस सुरुवातही केली. परंतु, अवैध प्रवाशांना देशाबाहेर काढण्याची प्रक्रिया खूप खर्चिक आणि वेळखाऊ आहे. याच कारणामुळे ट्रम्प प्रशासनाने थेट स्वेच्छा निर्वासनाच्या धोरणाचा आधार घेतला आहे. आता डोनाल्ड ट्रम्प सरकारच्या या आवाहनाला अमेरिकेत राहत असलेले अवैध प्रवासी कसा प्रतिसाद देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाचा कारभार स्वीकारताच संपूर्ण जगालाच डोकेदुखी ठरणारे निर्णय घेतले आहेत. त्यांच्या टॅरिफ धोरणाचा अर्थव्यवस्थेवर अत्यंत प्रतिकूल परिणाम झाला आहे. शेअर बाजार गडगडला. बेरोजगारीत वाढ झाली आहे. सरकारी नोकऱ्यांतही कपात झाली आहे. मानवाधिकारांवर प्रश्न आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध यामुळे अमेरिकेतील लोकांत संताप वाढला आहे. या कारणांमुळे लोकांनी आंदोलन सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे.
धक्कादायक! तैवानच्या सैन्यात चीनची घुसखोरी; पोलखोल झाल्यानंतर उडाली खळबळ