Houthi Attack : येमेनच्या हूथी बंडखोरांचा लाल समुद्रातील उच्छाद अजूनही (Houthi Attack) कमी झालेला नाही. या परिसरातून ये जा करणाऱ्या विविध देशांच्या जहाजांवर हल्ले करण्याचे सत्र या बंडखोरांनी सुरू केले आहे. आताही या बंडखोरांनी भारताकडे येणाऱ्या एका तेलाच्या जहाजावर मिसाइलचा मारा केला. या हल्ल्यामुळे या जहाजाचे मोठे नुकसान झाल्याचा दावा सुरक्षा फर्म एंब्रेन केला आहे. हे व्यापारी जहाज सेशेल्सचे असल्याचे सांगितले जात आहे.
‘महागाईचा भडका उडणार?’ हूथी बंडखोरांमुळे भरली जगाला धडकी
ब्रिटेनच्या सुरक्षा संस्था एंब्रेने दिलेल्या माहितीनुसार, ज्या जहाजावर हल्ला झाला त्या जहाजावर पनामाचा ध्वज होता. परंतु, या जहाजाची मालकी ब्रिटीश कंपनीकडे आहे. या जहाजाची विक्री केली असून आता हे जहाज सेशेल्समधील कंपनीच्या मालकीचे असल्याचे सांगण्यात येत आहे. ज्या जहाजावर हल्ला झाला ते तेलाचे टँकर असून रशियातील प्रिमोस्क येथून भारताती वाडिनारकडे निघाले होते.
इस्त्रायल हमास यांच्यातील युद्धापासून इराण समर्थित हुथी बंडखोर लाल समुद्र आणि एडनच्या आखातातून जाणाऱ्या जहाजांवर हल्ले करत आहेत. याआधी बंडखोरांकडून फक्त इस्त्रायलची जहाजे टार्गेट केली जात होती. आता मात्र या बंडखोरांनी अन्य देशांच्या जहाजांवर हल्ला करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे अनेक शिपींग कंपन्या आपली जहाजे दक्षिण आफ्रिकेच्या दूरच्या मार्गाने पाठवत आहेत. त्यामुळे माल वाहतुकीचा खर्च वाढला आहे. त्याचा परिणाम जागतिक पातळीवर महागाई वाढण्यात झाला आहे.
याआधी अमेरिका आणि ब्रिटीश सैन्याने काही दिवसांपूर्वी हूथी बंडखोरांच्या लपण्याच्या ठिकाणांवर हवाई हल्ले केले होते. यानंतर यानंतर हूथी बंडखोरांचा उच्छाद कमी होईल असेस वाटले होते. परंतु, तसे काही घडले नाही. या ताज्या घटनेने त्यांनी आपले उपद्रवमूल्य पुन्हा दाखवून दिले आहे. भारताने अरबी समुद्र आणि एडनच्या आखातात नौदल तैनात केले आहे. या भागातून होणाऱ्या जहाजांच्या वाहतुकीनवरही नजर ठेवण्यात येत आहे.
इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेले युद्ध अद्याप कायम आहे. गाझामध्ये लपलेल्या हमासच्या दहशतवाद्यांना पकडण्यसाठी इस्त्रायलने जंगजंग पछाडले आहे. पण त्याचवेळी या युद्धामुळे हूथी बंडखोरही आक्रमक झाले आहेत. 1990 मध्ये येमेनचे तत्कालीन अध्यक्षांना सत्तेतून खाली खेचण्यासाठी या संघटनेची स्थापना करण्यात आली होती.